Chikhali : चिखलीत योगदिंडीतून योगजागर

शब्दब्रम्ह व पोलीस नागरिक मित्र संघटनेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – योगदिनाचे औचित्य साधून चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रह्म काव्य, योगसंस्कार संस्था व पोलीस नागरिक मित्र, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिंडीच्या माध्यमातून मोरेवस्ती, कृष्णानगर परिसरात योगजागर घडविण्यात आला.

या योगदिंडीत योगसंस्कार वर्गातील बालवृंद, योग साधक, महिला, पुरुष तसेच पोलीस नागरिक मित्र मोठय़ा संख्येने सहभागी झाले. शब्दब्रम्हच्या प्रांगणापासून टाळ, खंजिरीच्या नादात ही दिंडी निघाली. स्वामी विवेकानंद सोसायटी, सानेचौक पोलीस चौकी, म्हेत्रे उद्यान, हनुमान मंदिर, कृष्णानगर ते पुन्हा शब्दब्रम्ह असा दिंडीचा मार्ग होता. आचरा योग; हटवा रोग, योग करा, योग आचारा, योगमहर्षी पतंजली मुनींचा विजय असो, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. त्याचबरोबर सदाचार सेवा पर्यावरण रक्षण, हेच नव्या युगाचे मूल्य शिक्षण, शील सेवा योग संस्कार, मानव धर्माचा हाच आधार, यासारखे फलक या वेळी मुलांच्या हातात झळकत होते. राहुल श्रीवास्तव यांच्या हस्ते मुलांना खाऊवाटप करण्यात आले.

कुंजीर दांपत्याला ‘योगदान पुरस्कार’

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगकार्यासाठी झटणा-या वैशाली कुंजीर व ज्ञानेश्वर कुंजीर यांचा ‘योगदान जाणीव पुरस्कारा’ने शब्दब्रम्हचे संस्थापक प्रभाकर चव्हाण, पोलीस नागरिक मित्र संघटनेचे अध्यक्ष बाबूराव फडतरे, सचिव राहुल श्रीवास्तव, उद्धव साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. शाहीर वसंत घाग, मथुराबाई पडधान, सरिता चव्हाण, इंदुताई कांबळे, आकाश दळवी व अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.