Pimpri : प्रेमसंबधातून युवकाचा खून; सराईत गुन्हेगार गजाआड

पाच जणांवर खुनाचा गुन्हा  

एमपीसी न्यूज – प्रेम संबंधातून युवकाचा खून करणा-या सराईत गुन्हेगाराला भोसरी, एमआयडीसी पोलिसांनी 12 तासाच्या आत गजाआड केले. ही घटना शुक्रवारी (दि.14)आळंदी रोड येथील वनीकरणाच्या जागेत घडली होती.

नामदेव नागोराव जाधव (वय 32, रा. चाकण)असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार अविनाश उर्फ अविराज रोहीदास देडे (वय 22, रा. आदर्शनगर, मोशी) याला गजाआड केले असून अक्षय सोनवणे, अदित्य मु-हे, महादेव भाग्यवंत, आकाश गायकवाड या त्याच्या चार साथीदारांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव जाधव याचे दोन विवाह झाले असून तो  एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी करत होता. त्याच कंपनीत आरोपी अक्षय सोनवणे यांची मैत्रिण देखील कामाला होती. आरोपी अक्षय याच्या मैत्रिणीसोबत जाधव याचे प्रेमसंबध रुढ झाले. या रागातूनच आरोपी देडे आणि त्याच्या साथीदारांनी नामदेव जाधव याला शुक्रवारी आळंदी रोड येथील वनीकरणाच्या जागेत नेऊन बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या जाधव याचा खून झाला. आरोपींनी त्याला मोशीतील एका रुग्णालयात दाखल करुन पसार झाले. जाधव याच्या अंगावरील जखमा संशायस्पद वाटल्याने एमआयडीसी पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली.

रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले असता जाधव याला रुग्णालयात दाखल करुन जाणा-यांपैकी आरोपी अविनाश देडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी देडे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने प्रेमप्रकरणातून आपल्या साथीदारांसह जाधव याचा खून केल्याची कबूली दिल्याचे, एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. देडे याला पुढील तपासासाठी चाकण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार अजय भोसले, रविंद्र तिटकारे, संदीप भोसले, पोलीस नाईक संजय भोर, किरण काटकर, पोलीस शिपाई गणेश जगदाळे, नवनाथ पोटे, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अमोल निघोट, करन विश्वासे, विशाल काळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.