Hinjawadi : किरकोळ कारणावरुन तरुणाला लोखंडी फावड्याने मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये रस्त्याचे काम सुरु असताना पाण्याचा टँकर आतमध्ये आणल्याचा जाब विचारल्यावरून सोसायटीमधील फ्लॅटधारकाने सोसायटीमध्ये देखभालीचे काम करणा-या तरुणाला फावड्याने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी चारच्या सुमारास अचल डेव्हलपर्स साईट, कसरसाई येथे घडली.

सुभाष अशोक येवले (वय 27, रा पाचाणेगाव, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शरद खेंगरे (रा. मारुंजी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसरसाई येथे अचल डेव्हलपर्स कंपनीची बांधकाम साईट सुरु आहे. या सोसायटीमध्ये रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहनांना आतमध्ये आणण्यास ठराविक कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. या सोसायटीमध्ये सुभाष देखभालीचे काम करतात. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास शरद याने पाण्याचा टँकर आतमध्ये आणला. त्यामुळे सुभाष यांनी शरद याच्याकडे विचारणा केली. यावरून शरद याने सुभाषला शिवीगाळ करत चालू बांधकामावरील लोखंडी फावड्याने मारहाण केली. यामध्ये सुभाषच्या चेह-यावर, पायावर गंभीर दुखापत झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.