-MPC-TOP-MOST-BANNER-I

Ravet News : रावेत मधील तरुण महाबळेश्वरच्या जंगलात बेपत्ता

पत्नीशी झाले होते भांडण

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पत्नीशी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून घराबाहेर पडलेला रावेत मधील तरुण महाबळेश्वर च्या जंगलात बेपत्ता झाला आहे. महाबळेश्वरपासून चार कि.मी. अंतरावर त्याची कार बेवारस स्थितीत आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

रोमित गजानन पाटील (वय 32, रा. रावेत, ता. हवेली, जि. पुणे) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमित एका खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करतो. 16 जानेवारीला त्याचे किरकोळ कारणावरून पत्नीशी भांडण झाले. या भांडणातून रोमित आपली मारुती कार घेवून सायंकाळी पाच वाजता घराबाहेर पडला.

दोन दिवस झाले तरी तो घरी परत न आल्याने त्याच्या पत्नीने देहूरोड पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी रोमितचे फोटो जवळपासच्या पोलीस ठाण्यांना पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.

शुक्रवारी (दि‌.22) सकाळी महाबळेवर पोलिसांना महाबळेश्वरपासून 4 कि.मी. अंतरावर अंबेनळी घाटात गेले दोन दिवसांपासून एक कार बेवारस स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली. महाबळेश्वर पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला असता ही कार रोमितची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली मात्र, रोमित बेपत्ता असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली.

महाबळेश्वर पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण करत रोमितच्या शोध घेण्यास सुरुवात केली. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी दोन दिवस अंबेनळी घाटात संशयित ठिकाणी शोध सुरू केला. परंतु त्याचा कोठेही शोध लागला नाही.

दरम्यान, रोमितच्या मित्र व नातेवाईक महाबळेश्वर येथे गेले. त्यांनी रोमितची गाडी उघडली. त्यामध्ये एक तुटलेला मोबाईल आढळून आला पण त्यात सिम आढळलं नाही. गाडीत इतर काही साहित्य नव्हते. महाबळेश्वर पोलिसांनी रोमितने घाटात सोडलेली गाडी नातेवाइकांच्या ताब्यात दिली आहे‌‌. सध्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने तसेच इतर नातेवाईकांना संपर्क केला आहे का याबाबत तपास सुरू आहे. असे महाबळेश्वर पोलिसांनी सांगितले.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.