Maval News : कुसगाव धरणावर बोटिंगसाठी गेलेल्या तरुणांना बोट चालवणाऱ्यांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगाव धरणावर बोटिंगसाठी गेलेल्या तरुणांना बोट चालवणा-या चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 31) रात्री सात वाजताच्या सुमारास घडली.

आकाश राजेंद्र टेकाळे (वय 21, रा. थेरगाव) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र कुसगाव धरणावर बोटिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी केदारी यांची बोटिंग चालवणारे चारजण आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादी यांनी आरोपींना ‘काका शिव्या कशाला देता नीट बोला’, असे म्हटले. या कारणावरून एकाने कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारले. दुसऱ्याने लोखंडी रॉडने हातावर मारले. इतर दोन जणांनी लाथांनी मारून फिर्यादी यांना जखमी केले.

तसेच फिर्यादी यांच्या मित्रांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी जखमी केले. ‘आम्ही गाववाले आहोत. घरापर्यंत जाऊ देणार नाही. पाण्यात बुडवून मारीन’, अशी धमकी देऊन फिर्यादी यांचा मित्र शुभम भिसे याला पाण्यात ढकलून दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.