Chinchwad News : आपले आरोग्य आपल्या हातात – डॉ. राजेंद्र कांकरिया

एमपीसी न्यूज –  आपले आरोग्य आपल्या हातात आहे, असे मत डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि अंधश्रद्धा’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना राजेंद्र कांकरिया बोलत होते.

सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. रमेश इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविकातून “श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामधील सीमारेषा फार धूसर आहे!” असे मत व्यक्त केले. राजाभाऊ गोलांडे यांनी, “ज्येष्ठ नागरिकांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. अंधश्रद्धेमुळे सुशिक्षित व्यक्तीदेखील सहज फसतात, या गोष्टीचे आश्चर्य वाटते!” असे विचार मांडले.

डॉ. राजेंद्र कांकरिया पुढे म्हणाले की, “पूर्वी आपल्या देशात सतीची प्रथा होती; तसेच देवीची साथ किंवा कुष्ठरोग हे आजार गतजन्मीच्या पापांची फळे आहेत, अशा अंधश्रद्धा होत्या. समाजसुधारकांनी केलेल्या प्रबोधनामुळे या अंधश्रद्धांचे निर्मूलन झाले आहे. तरीही माझी ती श्रद्धा पण दुसऱ्याची ती अंधश्रद्धा, अशी प्रत्येकाची ठाम भूमिका असते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अंधश्रद्धांचा संबंध आरोग्याशी आहे. विशेषतः अंधश्रद्धांमुळे महिलांचे खूप मोठ्या प्रमाणावर शोषण होते. अजूनही देवदासी ही अनिष्ट प्रथा अस्तित्वात आहे. फक्त चिंचवड परिसरातूनच जटानिर्मूलनाची अडीचशे प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. केसांच्या आजारावर हमखास उपाय हा फसवणुकीचा धंदा आहे. केस काळे करणाऱ्या औषधांमध्ये अमोनियाचा वापर केला जात असल्याने तो त्वचेला हानिकारक असतो.

साध्या डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. सर्व मानसिक विकार हे मेंदूशी निगडित असतात. त्यामुळे अंगात वारे येणे ही गोष्ट मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासून घेतली पाहिजे. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे विकार आणि निद्रानाश या व्याधी जडतात. दूरदर्शन आणि प्रसारमाध्यमांमधील मालिका या मानसिक विकृतींना आमंत्रण देणाऱ्या असतात. आहार घेताना सकाळचा नाश्ता राजासारखा, दुपारचे जेवण प्रधानासारखे तर रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. महिलांमध्ये उपवास करण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. वास्तविक भूक लागली तर खा; आणि अजीर्ण झाल्यास उपवास करा, असा विज्ञानाचा सोपा सिद्धान्त आहे. खातानाही प्रत्येक पदार्थाचे प्रमाण ठरलेले असते, ते पाळले नाही तर अनारोग्य वाढते, असेही ते म्हणाले.

वजनदार वस्तू उचलताना, एका जागी बसताना शरीराच्या योग्य अवस्थेचे भान ठेवले नाही तर पाठदुखी, गुडघेदुखी या विकारांना सामोरे जावे लागते. फुफ्फुस आणि हृदय हे शरीरातील दोन महत्त्वाचे अवयव आहेत. त्यामुळे वयाच्या साठीनंतर त्यांची नियमित तपासणी आणि काळजी घेणे आवश्यक आहे. श्वास घेताना त्रास, खूप प्रचंड घाम, डोकेदुखी, उलटी होणे ही हृदयविकाराच्या झटक्याची पूर्वलक्षणे आहेत. अशा आणीबाणीच्या प्रसंगी ॲस्पिरिनची गोळी घेऊन तातडीने नजीकच्या डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते. मनांत कोणत्याही अंधश्रद्धा, शंका न बाळगता लस घेणे हा कोरानापासून वाचण्याचा रामबाण उपाय आहे.

चुकीच्या सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. त्यामुळे सुरवातीला प्रचंड त्रास झाला तरी व्यसने आणि वाईट सवयी एका झटक्यात सोडून द्या. प्रत्येक कुटुंबाचा एखादा फॅमिली डॉक्टर असणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायामाची नितांत गरज असते. ज्येष्ठांसाठी पायी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. योगासने तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने करावी. आपल्या प्रकृतीला झेपेल इतपतच व्यायाम करावा.

पुनर्जन्म, मोक्ष या भ्रामक कल्पना आहेत. आहे हाच जन्म विवेक, सारासार बुद्धीचा वापर आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे आनंदाने व्यतीत करा!” आरोग्यविषयी सोप्या सूचना, प्रात्यक्षिके सादर करून दत्ता हलसगीकर यांच्या कवितेने डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. गोपाळ भसे, अरविंद जोशी, नारायण दिवेकर, उषा गर्भे, जयमाला विभूते, सुधाकर कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, रत्नप्रभा खोत, भिवा गावडे, प्रकाश चिप्पा यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम गावडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.