Pimpri : भाजपची खेळी भाजपवरच उलटली; करायला गेले राज्य सरकारचा निषेध, झाला केंद्र सरकारचाही निषेध!

स्थायी समिती सदस्य निवडीवरुन भाजपमध्ये मतभेद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये स्थायी समिती सदस्यांच्या नावात मतभिन्नता होती. त्यामुळे सत्ताधारी भाजपने हिंगणघाट दुर्घटना, राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारावरुन राज्य सरकारचा निषेध केला. मात्र, हे प्रकरण भाजपच्याच अंगलट आले.  दिल्लीतील निर्भयाच्या आरोपीला फाशी देण्यास विलंब होत असल्याचा उल्लेख करत विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला. तसेच एखाद्या मुलाला कोणतीही मुलगी आवडली असेल तर  तिला पळवून आणू असे वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम यांचा देखील राष्ट्रवादी, शिवसेनेने समाचार घेतला. महासभेत राज्य आणि केंद्र सरकारचाही निषेध झाला. अखेरीस 26 फेब्रुवारीपर्यंत सभा तहकूब करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची सभा आज (गुरुवारी) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विषयपत्रिकेवर स्थायी समितीत नवीन सदस्य निवडण्याचा विषय होता. परंतु, भाजपमध्ये सदस्यांच्या नावावरुन मत्तभिन्नत होती.  सभेच्या सुरवातीला भाजप नगरसेविका शारदा सोनवणे यांनी हिंगणघाट येथील घटनेत मृत पावलेल्या तरुणीला श्रद्धांजली वाहन्याचा ठराव मांडला. त्याला भाजपच्या माधवी राजापूरे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर भाजप नगरसेविका प्रियंका बारसे, माया बारणे, सुजाता पलांडे, आशा शेंडगे, सीमा सा‌ळवे यांनी श्रद्धांजली वाहत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारचा निषेध केला. भाजपचे बाळासाहेब ओव्हाळ यांनी तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.

हिंगणघाटमधील घटना दुर्दैवी आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनेवरुन कोणीही राजकारण करु नये, असे आवाहन करत राष्ट्रवादीच्या वैशाली घोडेकर यांनी दिल्ली दुर्घटनेतील निर्भयाच्या आरोपीला अजूनही फाशी होत नसल्याचा मुद्याकडे लक्ष वेधत केंद्र सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादीच्याच मंगला कदम यांनी  ‘घटना काय आहे, आपण बोलतो कशासाठी, गृहमंत्री कोण आहे, राजीनामा  कोणाचो मागत आहोत, हे जरा लक्षात घ्यावे. हिंगणघाट येथे झालेला प्रकार अमानवी आहे. आरोपीवर कारवाई व्ह्यायलाच हवी. त्यासाठी सरकारवर दबाव टाका, विरोधात बोला. पण हे करताना उगाचच राजकारणमध्ये आणू नका.

घटना घडली. त्यावेळी सर्वांनी हिंगणघाटला जायला पाहिजे होते. आधी सर्व माहिती घ्या मग बोला’, असे खडे बोल त्यांनी सुनावले. निर्भयाच्या आरोपीला फाशी का झाली नाही? असा सवालही कदम यांनी केला. मात्र, त्यानंतरही श्रद्धांजलीसाठी उभे राहणाऱ्या भाजप सदस्याने राज्य सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. याला प्रतिउत्तर म्हणून विरोधकांनी निर्भया प्रकरणीतील आरोपीची फाशी आणि भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांविषयी काढलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे दत्ता साने म्हणाले, दुर्देवी घटनेचे राजकारण केले जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून आणण्याची भाषा केली होती. मागील काळात पिंपरी-चिंचवड शहरात अत्याच्यारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तत्कालीन भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट असताना भाजपच्या नगरसेविका पोटतिडकीने बोलत नव्हत्या. अत्याराच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख कडक कायदा करत आहेत.

भाजपचे एकनाथ पवार यांनी ‘हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे सरकार नाही. तर, औरंगजेबाला अभिप्रेत असणारे सरकार आहे’ अशी टीका केली. यावर संतापलेले शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले. ‘श्रद्धांजली सभेच्या नावाखाली सर्वच लोक राज्य सरकारवर टीका करण्याची संधी साधत आहेत. महिला सुरक्षा, शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, बाल अत्याचार यावर कोणी काही बोलत नाही. फक्त राजकारण करत आहे. पवार तर भाजपच्या प्रचारसभेत बोलत आहेत असे बोलतात. अहो पवार एकदा तरी नगरसेवकासारखे बोला’ असा शब्दांत कलाटे यांनी पवारांना उत्तर दिले.

राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले, अशा घटनांचे राजकारण करु नये. भाजपने ठरवून महासभा तहकूब केली आहे. चुकीच्या पद्धतीने सभागृह चालविले जात आहे. सभागृहाच्या दर्जा खालावत आहे. महापालिकेचे अधिकारी देखील सुरक्षित नाहीत. यापुढे सभागृहात पक्षीय राजकारण करु नये.

विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, हिंगणघाट येथील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भाजपने भावनिक मुद्याला वेगळे वळण दिले. महापौर दुजाभाव करतात. सत्ताधारी नगरसेवकांना बोलून देतात. मात्र, विरोधक बोलत असताना त्यांना थांबवतात. मी कोणाला शिकवायला आलो नाही आणि मी आडाणी विद्यार्थी घेत पण नाही’, अशी टीका त्यांनी भाषणात अडथळे आणणा-या भाजप नगरसेवकांवर केली.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा आम्ही निषेध केला. प्रत्येक नगरसेविकेने पोटतिडीकेने भावना मांडली आहे. त्यामुळे हिंगणघाट घटनेतील पिडीतेला श्रद्धांजली वाहून आजची सभा गुरुवारपर्यंत तहकूब करण्याची सूचना केली. त्याला मोरेश्वर शेंडगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौरांनी 26 फेब्रुवारीपर्यंत सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like