Vadgaon News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी वडगाव मावळ येथे कारवाई करत बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

कुणाल बाबाजी हरपुडे (वय 18, रा. ढोरेवाडा मोरे चौक, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलसीबीचे पोलीस वडगाव परिसरात पोलीस रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी वडगाव रेल्वे स्टेशन शेजारी एका मोकळ्या मैदानात एक तरुण संशयास्पद थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती एलसीबीच्या पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कुणाल हरपुडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी 50 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी कुणाल याने हे पिस्टल मध्य प्रदेश येथून आणले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे, मुकुंद आयचीत, प्राण येवले, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.