Hinjawadi News : गुटखा विक्रीसाठी निघालेल्या तरुणाला अटक; सव्वा लाखाचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – गुटखा विक्रीसाठी निघालेल्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या तरुणाकडून सव्वा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 27) पहाटे माणगाव येथे करण्यात आली.

सुमंत दीपाराम देवासी (वय 22, रा. पिरंगुट, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक अन्नाराव राठोड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे एकजण दुचाकीवरून गुटखा विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माणगावात शनिवारी पहाटे सहा वाजता कारवाई करून आरोपी सुमंत याला दुचाकीसह (एम एच 12 / पी एम 9998)  ताब्यात घेतले. त्याच्याकडे प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

तो सकाळच्या वेळी गुटखा विक्रीसाठी जात असल्याचे निश्पना झाल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सुमंत यांच्याकडून एक लाख 24 हजार 800 रुपयांचा गुटखा आणि 50 हजारांची एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.