Nigdi : ‘भाई का म्हणत नाही’, असा जाब विचारत तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – ‘भाई का म्हणत नाही, मी या वस्तीतला दादा आहे’, असा जाब विचारत एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपीने परिसरात आरडा ओरडा करून दहशत निर्माण केली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री आठ वाजता ओटास्किम, निगडी येथे घडली.

सागर शहाजी सावंत (वय 26, रा. ओटास्किम, निगडी), अंकुश जाधव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विशाल विठ्ठल पायाल (वय 20, रा. ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल आणि त्यांचा मित्र रविवारी रात्री ओटास्किम मधील सम्राट हाऊसिंग सोसायटी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये मोबाईलवर गेम खेळत बसले होते. त्यावेळी आरोपी एम एच 14 / एच एक्स 4020 या दुचाकीवरून आले. आरोपी सागर याने हातात कोयता घेऊन ‘तू मला भाई का म्हणत नाही. मी या वस्तीतला दादा आहे. तुला वेळोवेळी सांगितले असताना तू माझे ऐकत नाही’ असे म्हणत विशाल यांच्यावर कोयत्याने वार केले. विशाल यांच्या पाठीवर, हातावर गंभीर इजा झाली आहे. आरोपी अंकुश याने विशाल यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आरडा ओरडा केला. दहशतीच्या भीतीने लोकांनी आपली दारे खिडक्या लावून घेतली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.