Pimpri News : केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेसचा ‘आक्रोश’ मशाल मोर्चा

एमपीसी न्यूज : केंद्रातील  मोदी सरकारच्या शेतकरी कामगारांच्या काळ्या कायद्यांविरोधात व संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केल्याच्या निषेधार्थ आज पिंपरीत शहर युवक काँग्रेसच्या वतीने आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात आला. पिंपरी चौक ते एच ए कंपनी गेट जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत हा आक्रोश मशाल मोर्चा काढून  मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

हातामध्ये झेंडे, निषेध फलक व मशाल घेऊन युवक काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावरून चालत घोषणा देत मोर्चात सहभागी झाले. या प्रसंगी मोदी सरकार मुर्दाबाद !, कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्या ! शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा ! संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करणा-या मोदी सरकारचा निषेध असो ! किसान के सन्मान मे युवक काँग्रेस मैदान मे!
अशा घोषणा देण्यात आल्या.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “भारतीय लोकशाही तील सर्वात वाईट पर्व सध्या सुरू आहे, सर्वच स्तरांवर मोदींचे सरकार अपयशी ठरले आहे. महागाईने देश हवालदिल झाला आहे. त्यात हे भांडवलदार धार्जिणे कायदे आणून भाजपाचे मोदी सरकार नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहेत. शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांविरोधात आज शेतकरी प्रंचड मोठ्या संख्येने गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्ली राज्याजवळ ठाण मांडून बसलेला आहे. याबाबत चर्चा होऊन सदर चुकीचे कायदे बदलणे कामी अत्यंत महत्वाचे असलेले हे हिवाळी अधिवेशन रद्द करून मोदी सरकारने शेतकरी व संपूर्ण देशांतल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

खरे पाहता मोदी सरकारमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिम्मत नाही. त्यामुळेच त्यांनी अधिवेशनच रद्द करून पळपुटेपणाचा पुरावा दिला आहे. आजचा आक्रोश मोर्चा हा तमाम शेतकरी, कामगार व लोकशाहीच्या गैरवापरातून होणा-या सामान्य नागरिकांची मुस्कटदाबीचा निषेधार्थ आहे” असे बनसोडे म्हणाले.

याप्रसंगी प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव अक्षय जैन, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, कामगार नेते प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, युवक कांग्रेसचे शहर सरचिटणीस स्वप्निल बनसोडे, दिपक भंडारी, मिंलिद बनसोडे, अर्णव कामठे, रोहन वाघमारे, प्रविण जाधव, पांडूरंग वीर, रहीम चौधरी, बाबू खान, आदि पदाधिकारी व बहूसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.