Pune News : त्या तरुणाचा मृत्यू विजेच्या धक्याने  नाही – महावितरण 

 एमपीसी न्यूज –  कोथरूडमध्ये भुसारी कॉलनीतील ओपन जीमवर व्यायाम करताना सोमवारी (दि. 20) रात्री 8 वाजता एका 22 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Pune News) तथापि ओपन जीमजवळ कोणत्याही प्रकारची वीजजोडणी दिलेली नाही तसेच तेथील भूमिगत लघुदाब वीजवाहिनीमधून युवकाला विजेचा धक्का बसला नसल्याचे प्राथमिक तांत्रिक तपासणी व विविध चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.

 

महावितरण ने दिलेल्या स्पष्टीकरनात म्हटले आहे की  युवकाच्या मृत्यूप्रकरणी विद्युत धक्का कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने महावितरणकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाला लगेचच कळविण्यात आले. विद्युत निरीक्षकांकडून मंगळवारी (दि. 21) याप्रकरणी तपासणी व चाचण्यांद्वारे चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार महावितरणकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

याबाबत माहिती अशी की, भुसारी कॉलनीतील ओपन जीममध्ये विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी (दि. 20) रात्री पावणे नऊच्या सुमारास मिळताच महावितरणच्या कोथरूड उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व जनमित्रांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली.(Pune News) एका खुल्या मैदानाच्या बाजूला असलेल्या पदपथावर हे ओपन जीम आहे. पदपथाच्या एका बाजूला वितरण रोहीत्र तर दुसऱ्या बाजूला मिनी फिडर पिलर आहे. तर या दोन्हीच्या दरम्यान 30 मीटर लांबीची लघुदाब भूमिगत वीजवाहिनी (केबल) आहे.

 

 

Pimpri Chinchwad : पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने रोवला पिंपरी-चिंचवडकरांच्या शिरपेचात तुरा

 

घटनेनंतर रात्री परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत महावितरणकडून झालेल्या प्राथमिक पाहणी व चाचणीमध्ये ओपन जीमच्या कोणत्याही इक्यूपमेंटमध्ये विजेचा प्रवाह नसल्याचे दिसून आले. तसेच फ्यूज गेलेला नव्हता. वीजपुरवठा खंडित देखील झाला नव्हता. मध्यरात्रीनंतर एक वाजता स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार भूमिगत वीजवाहिनीची केबल टेस्टिंग व्हॅनद्वारे चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ही वीजवाहिनी सुस्थितीत असल्याचे आढळून आले. तथापि स्थानिकांच्या मागणीनुसार या वाहिनीवरून होणारा एका बंगल्याचा व सोसायटीचा वीजपुरवठा रात्रभर बंद ठेवण्यात आला.

 

त्यानंतर मंगळवारी (दि. 21) सकाळी विद्युत निरीक्षकांचे एक पथक संबंधित ठिकाणी आले. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार तसेच पोलीस विभाग व महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा भूमिगत लघुदाब वाहिनीची केबल टेस्टिंग व्हॅनद्वारे चाचणी करण्यात आली.(Pune News) मेगर व्हॅल्यू व व्होल्टेज लेवल चाचण्या घेण्यात आल्या. त्यातूनही विद्युत धक्का बसल्याचे आढळून आले नाही. तथापि, या संदर्भात विद्युत निरीक्षकांकडून अधिक तपासणी व चाचणी सुरू आहेत. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार महावितरणकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.