Dapodi : तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – काहीही कारण नसताना डोक्‍याच्या नाजूक भागावर मारल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री दापोडी येथे घडली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सचिन भिमराव भिंगारे (वय 27, रा. पवार वस्ती, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सनी सुरेश भोई (वय 23) आणि विशाल वाघमारे ऊर्फ पेरू (वय 19, दोघेही रा. पवार वस्ती, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव कोंडीबा भिंगारे (वय 65) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी आणि फिर्यादी यांचा मुलगा मयत सचिन हे एकत्र होते. भांडणाचे काहीही कारण नसताना आरोपींनी आपसांत संगनमत करून सचिन याच्या डोक्‍याच्या मागील नाजूक भागावर मारहाण केली. सचिन जमिनीवर कोसळला असल्याने सचिनच्या वडिलांनी त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सचिनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यामुळे आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत सचिन हा आरोपी मित्रांसोबत दारू पीत बसला होता. दारू पीत असताना हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.