Moshi : मोशीत तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खाणीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना मोशीत आज (मंगळवारी) दुपारी घडली. नागेश गाडगी (वय 25, रा. धावडे वस्ती, मोशी. मूळ रा. वजीर नगर, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल यांनी दिलेली माहिती अशी, नागेश मूळचा सोलापूर येथील असून तो बेरोजगार आहे. तो कामाच्या शोधात मोशी येथे राहणा-या आमीन सय्यद इनामदार या मित्राकडे आला होता. तो त्याच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी मोशी येथील खाणीमध्ये गेला. त्याला पोहता येत नसल्याने तो खाणीच्या कडेला बसून अंघोळ करत होता.
दरम्यान, त्याचे मित्र पोहत पोहत खाणीच्या दुस-या टोकाला गेले. त्यावेळी नागेशचा पाय घसरून तो पाण्यात पडला. मित्र दुस-या बाजूला असल्याने त्यांना नागेशपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. तोपर्यंत नागेश पाण्यात बुडाला होता. त्याच्या मित्रांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली. अग्निशमन विभागाच्या मदतीने नागेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.