Youth Inspiration : दक्षिण दिग्विजय करणारा सायकलपटू मंगेश दाभाडे

एमपीसी न्यूज (दादाभाऊ मराठे) – तसे दाभाडे कुटुंबाला शौर्य, पराक्रम, बलिदानाचा खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक शौर्य गाजवलेले व्यक्ती या घराण्यात होऊन गेलेलं आपणास सुपरिचित आहेत, परंतु आज आपण चर्चा करणार आहोत ते नव्या युगातील निखळ आरोग्यदायी आयुष्याचा मंत्र जपणाऱ्या एका अवलियाची, पुणे ते कन्याकुमारी सायकल वारी करणाऱ्या अवलियाची.

12 एप्रिल 1986 ला दाभाडे कुटुंबात जन्मलेला एका सर्वसाधारण मुलगा आपले शालेय शिक्षण तळेगाव परिसरात पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षण उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड येथे पूर्ण केले व सिव्हिल इंजिनीअर पदवी घेतल्यानंतर बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. 2010 ते 2019 पर्यंत यशस्वीरित्या आपले करिअर घडवत असताना 2020 मध्ये कोरोना या महामारीमुळे सर्वांनाच लॉकडाऊनला सामोरे जावे लागले.

सर्वच उद्योग व्यवसाय बंद झाले, आरोग्याच्या समस्या समोर येऊ लागल्या. अनेकांना आरोग्याचे महत्त्व समजू लागले, माणसे पुन्हा व्यायामाकडे वळली, आरोग्यास उपयोगी असलेलं खाद्यपदार्थ खाणे, नियमित व्यायाम करणे अशा सवयी जोपासू लागले. अशातच पूर्वीपासून क्रीडा क्षेत्राची आवड असलेला हा आपला अवलिया सायकलिंगकडे वळला.

आपल्या मित्र परिवारातील अभिजित कासार या सायकलस्वाराकडे पाहून प्रेरणा घेत मार्च 2020 मध्ये सायकलिंग सुरु केली. पहिल्या दिवशी मात्र 4 किमी चा प्रवास करून थकलेला व्यक्‍ती पुढे जाऊन 1600 किमीचा सायकल प्रवास करून कन्याकुमारीपर्यंत पोहचेल, असे आम्हा मित्र परिवाराला कधी स्वप्नातही वाटले नव्हते.

मंगेश दाभाडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केल्यास समजते कि, पहिल्या दिवशी 4 किमी ने सायकलिंग सुरु केली त्यांनतर थोडे थोडे करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी जीवनातील पहिली सेंच्युरी राईड म्हणजेच 128 किमी प्रवास करून तळेगाव ते श्री क्षेत्र जेजुरी वारी केली, त्यानंतर त्यांचे सासरे हभप नारायण महाराज साने यांच्या देहान्तानंतर त्यांची मुकलेली पंढरीची वारी त्यांनी सायकलवर अवघ्या 13 तासांत पूर्ण केली.

दरम्यानच्या काळात दर चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ महागणपतीला जाणे, दर रविवारी लोणावळा तसेच श्रावण महिन्यात भीमाशंकर सायकल राईड तसेच 26 जानेवारीला सद्भावना रॅली सोबत पुणे- मुंबई सायकल रॅली हे सगळे सायकलने फिरणे अशा अनेक राईड त्यांनी केल्या आहेत.

2020 मध्ये मावळ ॲथलेटिक असोसिएशनसोबत मावळ परिक्रमा अंतर्गत मावळातील सर्व धरण परिक्रमा पूर्ण केली. तसेच 2021 मध्ये सर्व राज्य सीमा खुल्या झाल्यावर इंडो ॲथलेटिक सोसायटी सोबत त्यांनी आयुष्यातील नेहमी स्मरणात राहील अशी व अभिमानस्पद अशी पुणे ते कन्याकुमारी अशी 1,600 कि.मी.ची दक्षिण दिग्विजय मोहीम 10 दिवसात एकूण 86 तास सायकल चालवून फत्ते केली.

आज पर्यंत दोन वर्षांमध्ये एकूण सायकल प्रवासाचा लेख जोखा पाहिल्यास 2,500 किमीचा सायकल प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे. त्यामध्ये 510 दिवस सायकलिंग केली असून 3 वेळा 2005 किमी, 59 वेळा 100 किमी, 123 वेळा 505 किमीचा समावेश आहे. एवढा प्रवास करत असताना भारतातील सहा राज्यांतील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर, बेळगाव, येल्लापूर,कारवार, गोकर्ण महाबळेश्वर, मुरुडेश्वर, कुन्नूर,थालसरी, उपडी, मंगलोर, कोझिकोडे, गुरुवायूर, कोची, अल्लपुझा, कोल्लम, तिरुअनंतपुरम, कन्याकुमारी अशा अनेक छोट्या व मोठ्या शहरांना भेट दिली.

त्यांचे मित्र दादाभाऊ मराठे, सुभाष राक्षे व विशाल रेणुसे सांगतात की, स्वतः आरोग्यदायी जीवनशैली जगत असताना आम्हा मित्रांनाही त्यांनी प्रभावित केलं असून दर रविवारी सह्याद्री भटकंती शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीपासून सुरु केली व जबरदस्तीने आम्हा मित्र परिवाराला इतिहास, गड-किल्ले व व्यायामाची आवड लावली. आजपर्यंत आम्हा मित्रांचे किल्ले लोहगड, विसापूर, राजमाची, तिकोना, कोराईगड, गहनगड, राजगड, सिंहगड, तोरणा, भैरवगड, हरिशचंद्रगड, रायगड एवढे किल्ले सर झाले आहेत.

तर अशा या आमच्या ध्येयवेड्या मित्राला आम्हा मित्र परिवाराकडून जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या भविष्यातील 40,075 किमीच्या पृथ्वी परिक्रमेसाठीही शुभेच्छा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.