Pimpri : अपघातप्रसंगी युवकांनी स्वयंस्फुर्तीने मदतीसाठी पुढे यावे – डॉ. ए.एम. फुलंबरकर

एमपीसी न्यूज – नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती किंवा अपघातप्रसंगी शासकीय यंत्रणांनी, पोलिसांनी मदत करावी, या अपेक्षेने वेळ वाया न घालविता त्या स्थळावर असणा-या युवकांनी स्वयंस्फुर्तीने मदतीसाठी पुढे यावे. आपत्ती व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त ज्ञान विद्यार्थ्यांना, नागरिकांना व्हावे, यासाठी अशा कार्यशाळा ठिकठिकाणी आयोजित केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित केली होती. याचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड मनपाचे आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख ओमप्रकाश बहिलवाल, एनडीआरएफचे निरीक्षक राजेंद्र पाटील, प्रा. अतुल पवार, डॉ. शितल भंडारी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राजेंद्र जगताप, कार्यक्रम समन्वयक सी. एल. लाडेकर आदींसह विद्यार्थी आणि पीसीसीओईचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बहिलवाल यांनी ‘नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीप्रसंगी, आग आणि अपघातप्रसंगी घ्यावयाची काळजी’ याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करुन घेतले. राजेंद्र जगताप यांनी एनडीआरएफने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपत्कालीन प्रसंगी केलेल्या मदतीची माहिती दिली. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणा-या विविध साधनांची माहिती दिली. ही साधने हाताळण्याबाबत प्रात्यक्षिके करुन घेतली. प्रा. अतुल पवार यांनी सायबर सिक्युरिटी याविषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक सादर केले.

या कार्यशाळेचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. स्वागत प्रा. राजेंद्र जगताप, सुत्रसंचालन प्रविण रंदळे व स्वराली काळे आणि आभार प्रा. सी. एल. लाडेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.