Maval News : युवराज संभाजीराजे छत्रपती यांची विसापूर, लोहगड किल्ल्यांना भेट; अंगणात बसून घेतला गावरान जेवणाचा आस्वाद

एमपीसी न्यूज – कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मावळातील प्रसिद्ध विसापूर आणि लोहगड या किल्ल्यांना आज (दि.03) भेट दिली. दगडी वाटेतून मार्ग काढत त्यांनी प्रथम विसापूर किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गडपायथ्याला आल्यावर अंगणातील रम्य झाडीत बसून गावरान जेवणाचा आस्वाद घेतला. यानंतर किल्ले विसापूरलाच लागून असलेल्या लोहगडची संभाजीराजे यांनी चढाई करून पाहणी केली. आपल्या भेटीचा अनुभव आणि फोटो संभाजीराजे यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.

युवराज संभाजी राजे यांनी विसापूर, लोहगड किल्ल्यांना भेट दिल्यानंतर आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये संभाजी राजे यांनी असे म्हटले आहे की, आज किल्ले विसापूर व लोहगड किल्ल्यांना दिलेल्या भेटीदरम्यान आपुलकीने आमचे आदरातिथ्य केले ते बोरडे कुटुंबीयांनी. सकाळी विसापूर किल्ल्याच्या चढाईसाठी गडपायथ्याला येताच तिथे बोरडे कुटुंबीयांना आमच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था सांगून गडावर गेलो.

गड पाहून दुपारी बोरडे यांच्या अंगणातील रम्य झाडीत बसून जेवण केले. अत्यंत आपुलकीने केलेले अस्सल गावरान पद्धतीच्या जेवणाने मन अगदी तृप्त झाले. यानंतर किल्ले विसापूरला लागून असलेल्या लोहगडची चढाई करण्यासाठी सज्ज झालो.

अमोल बोरडे व कुटुंबीय हे इथले स्थानिक रहिवासी आहेत. गडपायथ्याला ते घरगुती भोजनगृह चालवितात. गड पहायला येणा-या शिवभक्तांना, पर्यटकांना पोटभर जेऊ घालणे  हेच त्यांच्या उपजीवीकेचे साधन! पर्यटकांना गडाबरोबरच इथल्या स्थानिकांच्या हातची चव व त्यांची आत्मियता देखील अनुभवायला मिळते.

फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन चळवळ राबवताना गडकोटांच्या जतन संवर्धनाबरोबरच गडाच्या घे-यातील जनतेला स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे राहणीमान उंचावले जावे, यासाठी माझे प्रयत्न आहेत. गडकोटांच्या घेऱ्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्धता व इतिहास प्रेमी, दुर्गप्रेमींची व पर्यटकांना मुलभूत सुविधा हा दुहेरी हेतू साध्य करण्यासाठी फोर्ड फेडरेशनच्या वतीने निश्चितच प्रयत्न केले जातील.

दरम्यान, संभाजी राजे यांच्या विसापूर, लोहगड किल्याला भेटीचे कौतुक करत अभिमानास्पद बाब असल्याचे म्हटले आहे तसेच काही युजर्सनी शासनाचे किल्ल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.