Pune News : झी स्टुडिओजच्या ‘आनंदी गोपाळ’ने रचला नवा इतिहास

0

एमपीसीन्यूज : 1886  साली जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणे समाजमान्य नव्हते तेव्हा वयाच्या केवळ अठराव्या वर्षी सातासमुद्रापार परदेशी जाणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले वैद्यकीय शिक्षण जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणजेच भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी.

झी स्टुडिओजनं आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांचा जीवनप्रवास इतिहासाच्या सोनेरी पानांवरुन रुपेरी पडद्यावर उलगडला आणि बॉक्सऑफिसवर हाउसफुलचे बोर्ड झळकले. ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

चित्रपट हे जरी मनोरंजनाचे माध्यम असलं तरी काही चित्रपट असे असतात जे मनोरंजनापलीकडे जाऊन कधी आपल्याला अंतर्मुख करतात तर कधी एक अनोखी प्रेरणा देऊन जातात. काही चित्रपट स्तिमित करणारे ठरतात तर काही अंतर्मुखतेचा संथ, समृद्ध अनुभव देणारे ठरतातं. ज्यानं समाजात मोठे बदल घडून येतात. असंच एक परिवर्तन झी स्टुडिओज निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ नं घडवून आणलंय.

आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे ध्यासपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार ‘आनंदी गोपाळ’ ह्या चित्रपटातून महिला वैद्यकीय महाविद्यालय आणि मोफत सेवा देणारे रुग्णालय या दोन्हीसाठी प्रेरणा मिळाल्याचं सांगतात.

१ फेब्रुवारी रोजी ह्या महाविद्यालयाचे अनावरण ‘आनंदी गोपाळ’ टीमच्या उपस्थितीत करण्यात आले. ह्या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले, “आनंदीबाईंनी जी चिकाटी, जिद्द आणि धाडस त्या काळात दाखवले ते खरेच अतुलनीय असून ते चित्रपट पाहून अक्षरशः हेलावून गेलो.

_MPC_DIR_MPU_II

समाजाचा विरोध असून देखील आनंदीबाई त्यांच्या ध्येयापर्यंत पोचल्या आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. हे पाहून मी मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय तातडीनं घेतला आणि तो पूर्णत्वास नेला. हे भारतातील तिसरे आणि महाराष्ट्रातील एकमेव महिला वैद्यकीय महाविद्यालय असून पाच गुणवंत मुलींना ‘आनंदी गोपाळ शिष्यवृत्ती’सुद्धा दिली जाणार आहे.”

ह्या निमित्ताने झी स्टुडिओज मराठीचे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणाले, “ही बातमी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आली आहे. खरं तर ही आनंदीबाई आणि गोपाळराव यांची पुण्याई आहे. ह्या निमित्ताने कलेची आणि ओघाने चित्रपटाची ताकद फार मोठी असते हे सिद्ध झालंय.

झी स्टुडिओजच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न कायम होता आणि या पुढेही राहील. आनंदीबाई आणि गोपाळराव ह्या ध्येयवेड्या जोडप्याची असामान्य कथा ‘डॉ. आनंदी गोपाळ जोशी-भारतातली पहिली महिला डॉक्टर यांचा प्रवास’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला याचा सार्थ अभिमान आहे.

सर्जनशील दिग्दर्शकाचं आणि त्यातही कथात्मक लेखकाचं कौशल्य प्रेक्षकांच्या अनुभवात भर घालत असते, तर कधी पुनःप्रत्ययाचा आनंद देत असते. ह्याचं श्रेय दिग्दर्शक समीर विद्वांस आणि चित्रपटाची पूर्ण टीम यांना जातं. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे मनापासून अभिनंदन करतो.”

चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणाले, “आनंदी गोपाळ पाहून मुजुमदार सरांना वाटलं की आपणही फक्त मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय काढावं आणि सिम्बायोसिसचं मुलींचं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं. ही गोष्ट खूप भावूक करणारी आहे आणि आनंदीच्या संपूर्ण टीमसाठी तर ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा खूप मोठा पुरस्कार आहे. मुजुमदार सर आणि त्यांच्या संपुर्ण टीमला सलाम!”

आनंदी गोपाळ यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी वेगळी वाट निवडली आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नवीन पाऊलवाट मोकळी करून दिली. समाजात हा आमूलाग्र बदल घडवून ‘आनंदी गोपाळ’ चं नाव सुवर्णअक्षरात लिहिलं गेलंय यात शंका नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.