Pune : झील एज्युकेशन सोसायटीने भागवली वांगणी गावाची तहान

दररोज दोन टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – सध्या महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाणीप्रश्‍नावर मात करण्यासाठी हातभार लावत झील एज्युकेशन सोसायटीने वांगणी या गावी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सामाजिक बांधिलकी म्हणून झील एज्युकेशन सोसायटीकडून 31 मे पासून पुढील महिनाभर गावास टँकरद्वारे मोफत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली.

दुष्काळ म्हटलं की प्रश्न निर्माण होतो तो पिण्याच्या पाण्याचा. पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेल्हे तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या वांगणी या गावी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. तीन हजार वस्तीचं गाव असणारे वांगणी हे गेले कित्येक वर्ष हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहे. परंतु आश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळत नाही. पिण्याच्या पाण्या अभावी येथील लोकांचं शहरी भागात स्थलांतरीत होत असल्याची खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

येथील गावकऱ्यांना रोजच्या वापरासाठी लागणारे पाणी हे रोजच्या रोज विकत घ्यावे लागत असे. झीलने केलेल्या मदतीमुळे आता त्यांचा आर्थिक भार कमी होणार आहे. यावेळी झील एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉ. अजित काटे यांनी वांगणी गावातील रहिवाशांना या उपक्रमाची माहिती दिली, त्याचबरोबर सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी केले.

यावेळी वांगणी गावातील सरपंच कमलाकर सुतार, दिगंबर चोरघे, विठ्ठल चोरघे, माजी सरपंच अशोक चोरघे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अमोल उबाळे, डॉ. ऋषिकेश काकांडीकर, डॉ. योगेन्‍द्र कुमार देवकर, तानाजी चोरघे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन एज्युकेशन सोसायटीचे सचिव जयेश काटकर आणि कार्यकारी संचालक प्रदीप खांदवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.