Vadgaon Maval : जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांची मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्राला भेट

एमपीसी न्यूज : कोविड-19 सुविधा केंद्राला जिल्हा परिषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (दि.२८)  प्रत्यक्ष भेट देत कामाचा आढावा घेतला. रजिस्टर तपासणी करीत कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहिली. प्रत्येक कक्षात कसे कामकाज चालते याची माहिती घेतली. नागरिक व प्रशासन यांचा थेट संवाद होणार असल्याने योग्य नियोजन केल्याबद्दल कौतुकही केले. कोरोना संकट काळात नागरिकांना दिलासा मिळेल असे केंद्र उभारल्याबद्दल आमदार शेळके यांचे आभार व्यक्त केले.

कोरोना रुग्ण व नातेवाईकांच्या मदतीसाठी बेड उपलब्धता व इतर गोष्टींची माहिती व्हावी यासाठी आमदार शेळके यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने शासकीय विश्रामगृह वडगाव येथे कोविड-19 मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्र सुरु केले.

मावळ तालुक्यातील कोरोनावर उपचार देणाऱ्या रुग्णालयांची नावे, तेथील बेड उपलब्धता, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, शासकीय आरोग्य योजनांची माहिती आदी गोष्टी एकाच छताखाली आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आधार मिळत आहे. यामुळे नातेवाईकांची होणारी धावपळ कमी झाली असून योग्य माहिती उपलब्ध होत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहे.

यामुळे अशा पद्धतीचे बहुउद्देशीय सुविधा केंद्र सगळीकडे सुरू झाले तर त्याचा नागरिकांना फायदाच होईल. प्रत्येक तालुक्यात असे सुविधा केंद्र उभारण्याची गरज आहे, असे वक्तव्य जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी बहुउद्देशीय केंद्राच्या भेटीदरम्यान केले.

यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य समन्वयक गुणेश बागडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.