Zydus Cadila : कोरोनावर प्रभावी औषध सापडल्याचा झायडस कॅडिलाचा दावा ; औषध वापराला भारतात परवानगी

एमपीसी न्यूज – झायडस कॅडिला या कंपनीनं कोरोनावर प्रभावी औषध सापडल्याचा दावा केला आहे. ‘विराफिन’ असं या औषधाचं नाव असून, औषध दिल्यानंतर सातव्या दिवशी कोरोना बाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे औषध कोरोनावरील उपचारांसाठी भारतात वितरीत करण्यासाठी DCGI नं मान्यता दिली आहे.

येत्या काही दिवसांमध्ये हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे.

‘विराफिन’ औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक आले आहेत. झायडसनं जाहीर केलेल्या निकालांनुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचं प्रमाण तब्बल 91.15 टक्के आहे. रुग्णांचे अहवाल हे 7 दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत. विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारांवरील इंजेक्शन्सप्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावा लागत असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

देशातील जवळपास 25 केंद्रांवर जायडसकडून या औषधाची चाचणी घेण्यात आली आहे. याचे निष्कर्ष उत्साहजनक आले आहेत. विराफीन दिल्यानंतर कोविड रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होत असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते. तसेच, रुग्णाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस देखील कमी होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.