गझलकार प्रशांत पोरे यांना “गदिमा साहित्य पुरस्कार” प्रदान

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे यांचा 2022 चा गदिमा साहित्य पुरस्कार हा पिंपरी चिंचवडचे गझलकार प्रशांत पोरे यांना त्यांच्या दीवान-ए-प्रशांत या गझलसंग्रहास 1 ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार  ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं.  शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि सामाजिक कार्यकर्ते हिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

प्रशांत पोरे हे मागील 22 वर्षांपासून कविता, गझललेखन करीत असून लोकव्रत प्रकाशनातर्फे त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘प्रिया’ फेब्रुवारी 2010 रोजी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते तर संवेदना प्रकाशनातर्फे दुसरा गझलसंग्रह ‘गझलप्रिया’ सप्टेंबर 2017 रोजी ज्येष्ठ संगीतकार स्व. रवी दाते यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

नक्षत्राचं देणं काव्यमंच तर्फे 17 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

पुरस्कार प्राप्त गझलसंग्रह ‘दीवान-ए-प्रशांत’ हा मराठी भाषेतील पहिला मुकम्मल (परिपूर्ण) दीवान असून सुरेश भट यांच्या जयंती दिनी 15 एप्रिल 2021 रोजी आई वडिलांच्या हस्ते गझलपुष्प प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला.ह्या संग्रहास साहित्य विहार संस्था, नागपूर आणि सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव यांचे उत्कृष्ट गझलसंग्रहाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

प्रशांत पोरे यांनी सातारा येथील ‘लेक वाचवा’ अभियानासाठी गीतलेखन, कराड अर्बन बँकेसाठी शताब्दी सोहळ्यानिमित्त गौरवगीत लेखन, मधुकर पिचड यांच्यावरील डॉक्युमेंटरी साठी गीतलेखन तसेच आकाशवाणी सातारा केंद्रावर व्यावसायिक जाहिरात लेखन केले आहे.

प्रशांत पोरे हे पिंपरी चिंचवड मध्ये गझल चळवळीसाठी प्रयत्न करणाऱ्या गझलपुष्प या संस्थेचे कार्याध्यक्ष असून या संस्थेच्या गझलकारांना अल्प किंमतीत गझलसंग्रह प्रकाशित करता यावेत यासाठी “ना नफा ना तोटा” तत्वावर ‘गझलपुष्प पिंपरी चिंचवड’ या प्रकाशन संस्थेची स्थापना त्यांनी केली असून आजवर तीन गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

विविध नियतकालिके, दिवाळी अंक यांतून कविता आणि गझललेखन करण्याबरोबरच एका न्यूज पोर्टलवर ‘आजची गझल’ हे सदर त्यांनी चालवले आहे. गझलरंग, ब्रम्हकमळ, गजलांकित, गझलपुष्प, साहित्यदीप प्रतिष्ठान, मसाप ह्या आणि इतर संस्थांतर्फे आयोजित विविध मुशायऱ्यातून महाराष्ट्रातील  अनेक शहरात गझल सादरीकरण त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.