मदत म्हणून अनोळखी माणसाला आपला फोन देत असाल तर सावधान

एमपीसी न्यूज – मोबाईल चोरांचा पिंपरी-चिंचवड शहर व आसपासच्या परिसरात सुळसुळाट झाला आहे. मोबाईल चोरीसाठी हे चोरटे देखील वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. अशीच घटना खेड तालुक्यातील राणूबाईमळा येथे शुक्रवारी (दि.18) घडली आहे. फोन करायचा म्हणून नगरिकाकडे फोनची मदत मागितली. मात्र फोन मिळताच दुचाकीवरून पळून जाण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. यावेळी नागरिकाच्या प्रसंगावधानाने आरोपी मात्र सापडले.

अजित नामदेव राठोड (वय 22 रा. नांदेड) व शशिकांत विनोद क्षिरसागर (वय 27 रा.जुन्नर) अशी अटक आरोपींची नावे असून अविनाश अंबादास काळवंडे (वय 23 रा. राणूबाई मळा, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी चालत जात असताना आरोपी दुचाकीवरून (एमएच14 जे. झेड 0436) आले . त्यांनी यावेळी फिर्यादी यांच्याकडे मदत म्हणून फोन करण्यासाठी त्यांचा मोबाईल मागितला. फिर्यादी यांनी मोबाईल देताच आरोपी दुचाकीवरून पाळून जाऊ लागले, यावेळी फिर्यादी यांनी दुचाकीवर मागे बसलेल्या चोराला ओढून खाली पाडले. यावेळी दुचाकी थांबवून दोन्ही चोरांनी फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सारे पाहून आसपासचे नागरिक फिर्यादीच्या मदतीला धावून आले व चोरांना नागरिकांनी पकडले. चाकण पोलिसांच्या हवाली चोरांना केले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यापूर्वीही चोरांनी दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला चालू गाडीवरून खाली पाडून महिलेचा मोबाईल चोरून नेला होता. चोरी करण्याची पद्धत दिवसेंदिवस बदलत असून नागरिकांनी सतर्क राहणे सध्या गरजेचे झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.