मोगरा फुलला, मोगरा फुलला…

सुरत येथे भरणाऱ्या मोगरा महोत्सवात दिसतो वेगळ्या रूपातील मोगरा

एमपीसी न्यूज- मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरु कळीयासी आला ही संत ज्ञानेश्वरांची अजरामर रचना. तिच्यातील रुढार्थ आणि शाब्दिक अर्थ जरी भिन्न असले तरी सर्वसामान्यांना ही रचना ऐकताना बहरलेली सुगंधित मोग-याची पांढरीशुभ्र फुलेच डोळ्यासमोर येतात. उन्हाळ्याची चाहूल देणा-या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे फुलवाल्याकडे मिळू लागणारे पांढ-याशुभ्र मोग-याचे भरघोस गजरे. गुजरातेतील सुरत येथे भरणाऱ्या मोगरा महोत्सवात मोगऱ्यापासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू पाहून मन हरखून जाते.

कैरी, उसाचा रस, रानमेवा या बरोबरच मोग-याचे गजरे दिसू लागले की समजावे उन्हाळा सुरु झाला. इतर कोणत्याही फुलांचे गजरे एरवी मिळतात. पण अस्सल मोग-याचा गजरा मिळण्यासाठी उन्हाळाच यावा लागतो. आजकाल मिळतात तसे तगरीच्या मोठ्या कळ्याचे मोग-याचे म्हणून विकले जाणारे गजरे नव्हेत. अस्सल सुगंधी मोगरा, त्याचा भरगच्च गुंफलेला गजरा आणि गजरा माळलेली लांबसडक वेणी हे दृश्य तसे आजकाल दुर्मीळच झाले आहे. पण कधीमधी दृष्टीस पडले तर उन्हाळ्यात सुद्धा सुगंधी शिडकावा झाल्याचा भास होतो.

मोग-याचे अनेक प्रकार आहेत. एक पदरी साधा मोगरा, डबल मोगरा, बटमोगरा, हजार मोगरा इत्यादी. आजकाल हजार मोग-याचे ताटवे शहरातूनच नव्हे तर गावातून सुद्धा हद्दपार झाले आहेत. त्याचा वेगळाच सुवास अजूनही मनात भरुन राहिलेला आहे.

हे सगळे मोग-याचे आख्यान सांगण्यासाठी निमित्त झाले ते व्हॉटस अॅपवर सध्या फिरणा-या मेसेजचे. गुजरातेतील सुरत येथे मोगरा महोत्सव भरतो. त्यावेळी मोग-याच्या फुलांच्या अनेक कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात. श्रीकृष्णाची मोग-याच्या फुलांनी केलेली आरास छायाचित्राद्वारे मेसेजमध्ये दाखवली आहे. तसेच विविध दागिने, पंखा, तोरण, कर्णफुले, रांगोळी, आसन एवढेच नव्हे तर मोग-याच्या फुलांनी सजवलेले आणि बनवलेले मखर देखील येथे आहे.

मोगरा हा मूळचा भारतीय आहे. त्याला संस्कृतमध्ये मल्लिका, हिंदीमध्ये बेला किंवा मोतिया आणि तेलगूमध्ये मल्ली असे म्हणतात. मोग-यापासून सुवासिक अत्तर तयार केले जाते. मोग-यासारखी पांढ-या रंगाची अनेक प्रकारची सुवासिक फुले आहेत, जाई, जुई, कागडा, मदनबाण, सायली इत्यादी. पण मोग-याचा सुवास वेगळ्याच प्रकारचा असतो. मोग-यामध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत. तसेच मोगरा हे फिलिपिन्सचे राष्ट्रीय फूल आहे.

"Mogra

"Mogra

"Mogra

"Mogra

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.