Chinchwad : मालिकांचे शीर्षकगीत गाणे हा आव्हानात्मक प्रकार- सावनी रवींद्र (व्हिडिओ)

 (स्मिता जोशी)

एमपीसी कट्ट्यावर सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रवींद्र

एमपीसी न्यूज- मालिकांचे शीर्षक गीत गाणे हा अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक प्रकार आहे. कारण तो मालिकेचा चेहरा असतो. मालिका पाहणारा प्रेक्षक हा अगोदर शीर्षकगीत ऐकून मालिका पाहायची की नाही हे ठरवतो. त्यामुळे मालिकेचे शीर्षकगीत गाताना तुम्हाला एक मिनिटात सर्वोत्तम द्यावे लागते असे मत सुप्रसिद्ध युवा गायिका सावनी रवींद्र हिने एमपीसी कट्ट्यात बोलताना व्यक्त केले.

मूळची चिंचवडची पण विविध मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटगीते, दाक्षिणात्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन यात व्यस्त असणारी युवा गायिका सावनी रवींद्र चिंचवड येथील एमपीसी न्यूजच्या ऑफिसात एमपीसी कट्ट्याच्या निमित्ताने आली होती. यावेळी ती सध्या तिच्या सुरु असणा-या कामांबद्दल, सांगितिक वाटचालीबद्दल भरभरुन बोलली. चिंचवडच्या माटे स्कूलची विद्यार्थिनी असणारी सावनी सध्या मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटगीते, स्वतचे शो यामध्ये व्यस्त आहे. पण लहानपणापासून एमपीसी न्यूजशी असलेल्या घरगुती संबंधांमुळे वेळात वेळ काढून मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आली होती. यावेळी तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मी चिंचवडकर आहे याचा मला खूप अभिमान आहे. कोणतेही गाणे गाताना, कार्यक्रम करताना सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर मोरया गोसावींची प्रतिमा असते. त्यांचे स्मरण करुन मी माझे कार्यक्रम सादर करते. माझा प्रत्येक पहिला कार्यक्रम मी चिंचवडमध्येच केला आहे, असे ती अभिमानपूर्वक म्हणाली.

लहानपणापासून घरातच गाणे असल्यामुळे ते संस्कार आपोआपच सावनीवर झाले. गवयाचे पोर सुरावरच रडतं या न्यायाने गाणा-या आई वडिलांच्या घरी जन्माला आल्यामुळे तिला गाण्याचे संस्कार उपजतच झाले. मात्र आई वडिलांनी कधीही माझ्यावर गाणंच शिक असं दडपण आणले नाही. मात्र माझा कल गाण्याकडेच होता. माझ्यातील गाण्याचा कल ओळखून ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी आई बाबांना सांगितले की हिच्याजवळ अभिव्यक्ती उत्तम आहे, त्यामुळे तिला पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पाठवा. खरंतर आई आणि बाबा दोघेही शास्त्रीय संगीतातील नामवंत कलाकार. संगीतात डॉक्टरेट केलेले. पण मी सुगम गायनाकडे सहजगत्या वळले आणि चौदाव्या वर्षीच ज्येष्ठ गायक संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली.

पुढे फर्ग्युसन विद्यालयातून संस्कृतमध्ये बीए आणि मराठीत एमए केले. वेगवेगळ्या भाषा शिकण्याची मला जात्याच आवड असल्याने विविध भाषांमधील गाणी मी ऐकत असे. त्यातूनच नंतर तामीळमध्ये गाण्याची संधी मिळाली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खूप शिस्तबद्धता आहे. आपल्याकडे ती खूप कमी आहे. त्यामुळे तिकडे काम करताना मजा येते. तिथे मी तामीळ, मल्याळी, तेलगू, कन्नड सगळ्या भाषांमध्ये गायन केले आहे. त्या गाण्यावर कर्नाटक शैलीची छाप असते. पण एकदा त्यातील बारकावे समजून घेतले की मजा येते. तिकडे पाट्या टाकण्याची वृत्ती नसते, प्रोफेशनॅलिझम प्रचंड असल्याने काम करताना समाधान मिळते.

रिअॅलिटी शोच्या अनुभवांबद्दल विचारले असता सावनी म्हणाली की, अशा प्रकारचा रिअॅलिटी शो करण्याचा कोणताही विचार नव्हता. कारण मला स्पर्धेची नेहमी भीती वाटते. माझ्या मनात तो पर्यंत असेच होते की स्पर्धेमधील वातावरणाला मी तोंड देऊ शकणार नाही. आणि माझ्या सुदैवाने तोपर्यंत मला कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याची वेळ आली नव्हती. माझ्यासाठी कधीही स्पर्धा योग्य नाहीत हेच माझे मत होते. पण जेव्हा झी मराठीवरील सारेगमपच्या दहाव्या पर्वासाठी मला विचारणा झाली तेव्हा मी नकारच दिला होता. पण एक दिवस कमलेश भडकमकरने मला पुण्यात एक गाणे गाण्यासाठी बोलावले. तिथे मी माझे लाडके हे शामसुंदर राजसा हे गाणे गायले. दुस-या दिवशी झी कडून मी सारेगमपसाठी सिलेक्ट झाल्याचे कळवण्यात आले. तेव्हा मी अजून ऑडिशन कुठे झालेय असे विचारले. त्यांनी सांगितले की, काल झाली ती ऑडिशनच होती. आणि मग मी त्या स्पर्धेत सहभागी झाले आणि अंतिम पाच स्पर्धकांपर्यंत पोचले. हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव ठरला आणि मग मला झीच्या अनेक मालिकांची शीर्षकगीते गाण्याची संधी मिळाली. होणार सून या झीच्या बहुचर्चित मालिकेतील नाही कळले कधी हे एक प्रेमगीत गाण्याची संधी यामुळेच मिळाली.

मालिकांच्या शीर्षकगीतांविषयीच्या अनुभवाबद्दल बोलताना सावनी म्हणाली की, तिथे तुम्हाला एका मिनिटात सर्वोत्तम द्यावे लागते. खरंतर हे अत्यंत मुष्किल आहे. ते शीर्षकगीत मालिकेची ओळख असते, चेहरा असतो. त्यामुळे तिथे जीव ओतून काम करावेच लागते.

सावनी अनप्लग्ड या एका वेगळ्या प्रयोगामुळे पार्श्वसंगीताच्या एका वेगळ्याच क्षेत्रात सावनी स्वतचा ठसा उमटवून आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वाद्याचा समावेश न करता गाणी सादर करणे ही ती संकल्पना. सध्या या प्रकारच्या गाण्याची चलती असून सावनीचे स्वतचे प्रयोग देखील सुरु आहेत. कामानिमित्त पुणे मुंबई असा स्वत ड्राइव्ह करत प्रवास करणारी सावनी खूप फोक्सड आहे. देश परदेशातून गाण्याचे कार्यक्रम करणारी सावनी प्रसिद्धीच्या झोतात असूनही साधीच आहे हे यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवले, या सुमारे एक ते दीड तास चाललेल्या अनौपचारिक गप्पामधून सावनीची चिंचवडविषयी असलेली आपुलकी तिच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होती. सावनीला तिच्या भावी उज्जवल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.