बिग बॉसच्या निमित्ताने ..

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- सध्या अत्यंत लोकप्रिय अन सर्वाधिक चर्चिला जाणारा कार्यक्रम म्हणजे मराठी बिग बाँस . या कार्यक्रमाची रुपरेषा जर पाहिली तर तशी गमतीशीरच म्हणावी लागेल. 100 दिवस कसलीही व्यवधान न ठेवता आव्हानात्मक गोष्टींचा सामना करत जगापासून दूर एका घरात वेगवेगळ्या लोकाबरोबर राहायचं…त्यांच्यात टिकुन राहायच हेच महत्वाचे ! ज्याच्या मध्ये सर्वाधिक चिकाटी हा गुण तोच शेवटी ही स्पर्धा जिंकतो .शिवाय प्रेक्षकांच्या मतावर ही हा तुमचा गुण तपासला जातो की तुम्ही खरच 100 दिवस टिकु शकता का ?

आयोजकांच्या मते "हा कार्यक्रम कुठेही लिखित नसल्यामुळे जसे तुम्ही आहात तसेच दिसु ही शकता" यातला "शकता "! हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण हा कार्यक्रम लिखित नसला तरी त्यातल्या चित्रफितींवर इतर माध्यमातले संस्कार होतातच, त्यामुळे तुमच्या त्या माध्यमातल काय दाखवायच अन काय नाही, हे तिथे बाहेर बसलेली वेगळीच मंडळी आपापल्या कलात्मक बुध्दीवरुन ठरवतात. त्यांना वाटलं की ही एक घडामोड जास्त मनोरंजक होऊ शकते तर ते त्या पध्दतीने तुम्हाला लोकांसमोर सादर करतात. आणि तुम्हालाही याची कल्पना असते. मग यात तुमची प्रतिमा मलीन होते का? किंवा तुमच्या बददल मत काय तयार होतय ? याचं सोयरसुतक त्यांना ही नसतं अन संबधित कलाकारालाही नसतं..ITS ALL ABOUT BUSINESS हेच शेवटी खर या सगळ्यात असतं. 

मुख्य मुद्दा हा नाही की हे सगळ चाललेलं पैशांशी संबंधित आहे…मुळ मुद्दा येतो तो प्रतिमेचा .अनेकवेळा हा शो पाहाताना अस वाटतं की हे स्पर्धक इतक खोट वागत बोलत असतात की त्यावरुन हे प्रत्यक्ष आयुष्यातही असेच खोटे असावे असा समज आपला होतो. तो कितपत खरा कितपत खोटा त्यांनाच ठाऊक अन लखलाभ ही … बघा तुम्ही सहा दिवस एका बंद खोलीत राहिलेला एक स्पर्धक जो सातव्या दिवशी कॅमेर्‍यासमोर रडायला लागतो. बाहेर पडण्यासाठी गयावया करायला लागतो. हा तो स्पर्धक असतो ज्याने भूतकाळात आर्मीचे अत्यंत खडतर ट्रेनिंग पूर्ण केलेले असते, त्याच ते तसे रडणे, गयावया करणे अन नंतर परत घरात आल्यावर प्रेमाचे चाळे करणे अश्लील वर्तन करणे मनाला पटत नाही..अन दुसरीकडे इतर स्पर्धक ३१ व्या दिवशीच परिवाराच्या ओढीने व्याकुळ होऊन कॅमेर्‍यासमोर गळे काढताना दिसतात. अन प्रेक्षकांमध्ये सहानुभुती निर्माण करायला बघतात.

हा दिखाऊपणा आपल्याला सलतोच. सीमेवर जे माझे बांधव देशासाठी आज लढत आहेत वर्षानुवर्ष त्यांनी अस केल्याचे ऐकीवात नाही आणि ते शक्यही नाही. हे कलाकार कधी त्यांच्यासाठी काही करताना दिसत तरी नाही. हे कलाकार फक्त मुखाचेच हिरो, खरे नव्हेत. या अशा सहानुभुती पायी आपण चुकतोय कुठे तरी याची जाणच या कल्लाकारांना नाही. संस्कृती बद्दल तर या लोकांनी जरा विचारच करावा की आपण कोणत्या सस्कारांची बीजं रोवतोय ? विवाहित असलेले स्त्री पुरुष सर्रास इथे व्यभिचार करताना दिसतात अन त्याबददल स्फोटक विधानही करतात पुढचा मागचा काही एक विचार न करतात नुसते बोलत असतात. अस करुन आपल्या पुढच्या पिढ्यांकडे खरच योग्य संदेश पाठवत असतात का ते ?

२१ व्या शतकातील असुन सुध्दा मला हे प्रश्न पडत असतात. आज टिव्हीवर व इंटरनेटवर पाहिलेल्या गोष्टींच अंधानुकरण या समाजात माझ्या अन माझ्या पुढच्या पिढीकडुन सर्रास होताना मी पाहातोय. मग प्रश्न पडतो की माझा खरा संस्कार कुठला? फक्त आपण मुक्त आहोत हेच दाखवत बसणं हे सुध्दा गुलामगिरीचंच लक्षण आहे. त्यामुळे बिगबाँस ही संकल्पना चांगली असली तरी तिचं मातेरं होताना दिसत आहे सगळीकडेच ….

मला अस वाटत की ही टिकाव धरणारी, चिकाटी आणणारी संकल्पना आम्ही आमच्याच मातीत नीट संकर करुनच रुजवली पाहिजे तेव्हाच आम्ही संस्कारक्षम अन सक्षम पुढची पिढी तयार करु शकतो. मात्र सध्यातरी जे काही चाललय त्यावरुन तरी हा रस्ता कुठेच जात नसुन इथेच आहे अन आम्ही ही इथेच आहोत एवढंच ….आम्हाला सक्षम बिग बाँस बनायलाच हवं !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.