Maval Loksabha : मावळ मतदारसंघात उत्सुकता फक्त बारणे यांच्या मताधिक्याबाबत! जाणून घ्या मावळ मतदारसंघाचा ‘ग्राउंड रिपोर्ट’

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघातील सर्व आमदारांनी तसेच घटक पक्षांच्या बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुती धर्माचे पालन केल्यामुळे शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची ‘हॅटट्रिक’ निश्चित असून उत्सुकता फक्त त्यांना मिळणाऱ्या मताधिक्याबाबत आहे, असे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मागील दोन्ही निवडणुकांपेक्षा ही निवडणूक बारणे यांना आव्हानात्मक ठरेल असे बोलले जात होते, प्रत्यक्षात मात्र तसे चित्र दिसले नाही. मागील निवडणुकीत (Maval Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना कर्जत मतदारसंघात 1,850 मतांचे लीड मिळाले होते. बाकी पाचही मतदारसंघांमध्ये बारणे आघाडीवर होते. यावेळी सहाही विधानसभा मतदारसंघात बारणे आघाडीवर राहतील, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी विजयाचा दावा केल्याने तसेच काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अभिनंदनचे फलक लावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Pandharpur: विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी,पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु होणार

वाघेरे यांची भिस्त सहानुभूतीवर

या संपूर्ण निवडणुकीत संजोग वाघेरे यांची भिस्त उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या विषयी लोकांना वाटणारी सहानुभूती, नातेवाईकांचे जाळे, विनम्र व मितभाषी स्वभाव, पार्थ पवार यांच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तसेच लक्ष्मण जगताप यांच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी जगताप समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळेल, बारणे व मोदी यांच्याविषयी मतदारांमध्ये असलेली कथित नाराजी, या गृहितकांवर होती. बारणे यांच्यावर वैयक्तिक आरोपांची झोड उठवत निवडणूक खूप चुरशीची असल्याचे चित्र प्रसार माध्यमांमधून उभे करण्यात वाघेरे यांना चांगले यशही मिळाले.

बारणे यांचा वैयक्तिक राजकीय प्रभाव

बारणे यांना मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघातून मागील दोन निवडणुकींचा तगडा अनुभव होता. गेल्या दहा वर्षात केलेली कामे, संसदेतील सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी कामगिरी, मोदी सरकारचे लोकप्रिय निर्णय, सातत्याने मतदारसंघात ठेवलेला संपर्क, वैयक्तिक राजकीय प्रभाव या बारणे यांच्या जमेच्या बाजू होत्या. महायुती म्हणून यापूर्वी त्यांनी दोन निवडणुका जिंकल्याही आहेत. त्यामुळे महायुतीची उमेदवारी मिळवणे, एवढेच आव्हान बारणे यांच्यासमोर होते. भाजप आणि राष्ट्रवादीकडून बारणे यांच्या उमेदवारीला प्रारंभी तीव्र विरोध झाला. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि स्वतः बारणे यांनी मित्र पक्षांमधील नाराजी दूर करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्यामुळे भाजपमधील नाराजी फार काळ टिकू शकली नाही. भाजप पक्ष संघटनेने या वेळीही प्रामाणिकपणे बारणे यांना पूर्ण क्षमतेने पाठबळ दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीचा फटका?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी मात्र काही प्रमाणात शेवटपर्यंत दिसून आली. तेवढा विरोध होणार हे गृहीत धरूनच बारणे यांनी व्यूहरचना करून ठेवल्याचे पाहायला मिळत होते. झोपडपट्ट्या, आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील हक्काची मते व महाविकास आघाडीतील असंतुष्ट घटकांची मते मिळवण्यासाठी बारणे यांनी पद्धतशीर फिल्डिंग लावली होती.

निवडणूक व्यवस्थापनात वाघेरे पडले कमी

मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघात प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षांचीच ताकद दिसून येते. आतापर्यंत तीन वेळा निवडणूक जिंकूनही शिवसेना उबाठा गटाची या मतदारसंघात फारशी ताकद नाही. काँग्रेसचाही फारसा प्रभाव नाही. शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघात ताकद आहे, हे मान्य करावे लागेल. पण घाटावर त्या पक्षाचे अस्तित्वही नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबरोबर राहिलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या खूपच मर्यादित आहे. त्याचाच परिणाम म्हणून अनेक मतदान केंद्रांवर महाविकास आघाडीला कामासाठी कार्यकर्तेही मिळाले नसल्याचे दिसत होते.

पनवेलमध्ये बारणे यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा

आता विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा विचार करूयात. पनवेल हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. या मतदारसंघात बारणे यांना गेल्या निवडणुकीत 54 हजार 658 इतके मताधिक्य मिळाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाख 79 हजार 109 मते तर शेकापचे हरेश केणी यांना 86 हजार 379 मते मिळाली होती. प्रशांत ठाकूर यांना पनवेल मधून 92 हजार 730 इतके मताधिक्य मिळाले होते.

मध्यंतरीच्या काळात शेकापचे उमेदवार केणी तसेच पनवेल महापालिकेतील शेकापच्या 23 पैकी दहा नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले. त्याचा फायदा बारणे यांना मिळणार हे निश्चित आहे. पनवेलमध्ये झालेल्या दोन लाख 95 हजार मतदानापैकी दोन लाखांच्या आसपास मते घेत बारणे मोठी आघाडी घेतील, असे चित्र आहे.

चिंचवडमध्येही ‘विक्रमी’ मताधिक्य?

मावळमधील (Maval Loksabha) दुसरा मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चिंचवड! चिंचवड मतदारसंघाने बारणे यांना गेल्या निवडणुकीत 96 हजार 758 इतके मताधिक्य दिले होते. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना एक लाख 35 हजार 603 मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी 44 हजार 112 मते मिळवली होती.

या निवडणुकीत आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच नाना काटे, शत्रुघ्न काटे, राजेंद्र तरस, नीलेश तरस हे पूर्ण ताकतीनिशी बारणे यांच्या पाठीशी होते. खासदार बारणे यांचा या मतदारसंघावर मोठा वैयक्तिक राजकीय प्रभाव आहे. बारणे यांचे ‘होमपिच’ असलेल्या थेरगाव भागात तर होणाऱ्या मतदानाच्या 75 ते 80 टक्के मतदान बारणे यांना होते. या मतदारसंघात भाजप व मोदी यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून भाजपच्या या पॉकेट्समध्ये मतदानही चांगले झाले आहे. अनेक भागात तर मशालीचे नामोनिशाण पाहायला मिळाले नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात तीन लाख 22 हजार 700 मतदान झाले आहे. यातील पारंपारिक विरोधकांची मते बाजूला केली तरी बारणे यांचे मताधिक्य वाढून एक ते सव्वा लाखांच्या पुढे जाईल, असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे.

‘होम पीच’वरही वाघेरे यांना करावा लागला संघर्ष

पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. दादांच्या आदेशानुसार त्यांनी बारणे यांना मनापासून साथ दिल्याचे दिसून येत होते. या खेरीज भाजप व आरपीआयची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे स्वतः पिंपरी गावात राहणारे असले तरी तिथेही त्यांना एकतर्फी मतदान होईल, अशी परिस्थिती नाही. तरुण नगरसेवक संदीप वाघेरे यांनी बारणे यांच्यासाठी जीवाचे रान केल्यामुळे संजोग वाघेरे यांना तिथेही मत विभागणीला सामोरे जावे लागणार आहे. पिंपरी कॅम्पातील व्यापारी वर्ग हा बारणे यांचा हक्काचा मतदार आहे. सदाशिव खाडे, अमित गोरखे‌, सुजाता पालांडे, चंद्रकांता सोनकांबळे, तुषार हिंगे, योगेश बहल, डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, श्याम लांडे, शीतल शिंदे, प्रमोद कुटे, राजेंद्र बाबर, नारायण बहिरवाडे, राहुल भोसले, संजय काटे, सुनील पाथरमल, सरिता साने, जितेंद्र ननावरे, राजेश वाबळे आदींनी त्यांची ताकद बारणे यांच्या पाठीशी उभी केली.

मागील निवडणुकीत बारणे यांना पिंपरी मतदारसंघात 41 हजार 294 इतके मताधिक्य मिळाले होते. विधानसभा निवडणुकीला अण्णा बनसोडे यांना 86 हजार 985 तर शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांना 67 हजार 177 मते मिळाली होती. चाबुकस्वार यांना मिळालेल्या मतांमध्ये बारणे समर्थकांचाही मोठा वाटा होता हे विसरून चालणार नाही. वाघेरे हे स्थानिक उमेदवार असल्यामुळे तसेच राष्ट्रवादीतील असंतुष्ट नगरसेवकांनी त्यांना साथ दिली तरी देखील वाघेरे यांना या मतदारसंघातून निर्णायक मताधिक्य मिळेल, अशी परिस्थिती नाही.

मावळमध्ये ‘डबल इंजिन’चा फायदा

मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे. दरवेळी हे पक्ष एकमेकाविरुद्ध लढतात. मागील निवडणुकीत पार्थ पवार हे पवार घराण्यातील उमेदवार असतानाही मावळ मतदारसंघात बारणे यांना 21 हजार 848 चे मताधिक्य मिळाले होते. सुरुवातीला बाळा भेगडे व सुनील शेळके या दोघांनीही बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. महायुतीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मात्र दोघांनीही प्रामाणिकपणे महायुती धर्माचे पालन केल्याचे दिसून येत होते. राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते मात्र छुप्या पद्धतीने मशालीचा प्रचार करीत होते. मावळात काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. शरद पवार समर्थकांची संख्या देखील मोजकी आहे.

विधानसभा निवडणुकीत आमदार शेळके यांना एक लाख 67 हजार 712 तर बाळा भेगडे यांना 73 हजार 770 मते मिळाली होती. लोकसभेला मावळातील भाजपची मते हालल्याचे चित्र अजिबात नाही. राष्ट्रवादीची अगदी 50 टक्के मते जरी फिरली तरी देखील मावळात बारणे यांनाच चांगले मताधिक्य मिळेल, अशी परिस्थिती आहे. महायुतीला 30 ते 35 हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आजी-माजी आमदारांनी व्यक्त केला आहे.

कर्जत-उरणमध्ये चुरशीची शक्यता

कोकणातील उरण मतदारसंघ व कर्जत मतदारसंघात नेहमीच चुरस पाहायला मिळते. मागील निवडणुकीत उरण मतदारसंघात बारणे यांना 2 हजार 888 मताधिक्य होते तर कर्जतमध्ये ते 1 हजार 850 मतांनी पिछाडीवर होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय चित्र बदलले असून उरणमध्ये भाजपचे महेश बालदी तर कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे निवडून आले आहेत.

उरणमध्ये महेश बालदी यांना 74 हजार 549 मते मिळाली होती तर शिवसेनेचे मनोहर भोईर यांना 68 हजार 839 व शेकापचे विवेक पाटील यांना 61 हजार 601 मते मिळाली होती. उरणमध्ये शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे मनोहर भोईर हे वाघेरे यांच्याबरोबर असले तरी त्याचे मतांमध्ये कितपत रूपांतर होईल, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. या मतदारसंघात कोणालाही मोठी आघाडी मिळेल, अशी परिस्थिती नाही.

कर्जतमध्ये महेंद्र थोरवे यांना एक लाख दोन हजार 228 मते मिळाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा हा मतदारसंघ असल्यामुळे थोरवे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड यांना 84 हजार 162 मते मिळाली होती. ते सुरेश लाड देखील यावेळी बारणे यांच्याबरोबर होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांनीही या निवडणुकीत स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या काही असंतुष्ट नेत्यांनी मात्र विरोधात काम केल्याची चर्चा आहे. ही सर्व गोळा-बेरीज लक्षात घेतली तर या मतदारसंघात कोणालाही फार मोठे मताधिक्य मिळेल, असे चित्र नाही.

चिंचवड व पनवेल या दोन मतदारसंघात मिळणारे मोठे मताधिक्य संजोग वाघेरे कुठे तोडणार, हा खरा प्रश्न आहे. कोणी काहीही दावे करीत असले व कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी बारणे यांची हॅटट्रिक निश्चित मानली जात आहे. प्रश्न राहिला मताधिक्याचा… मागील मताधिक्याचा विक्रम यावेळी मोडला जाईल, असा विश्वास बारणे यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. संजोग वाघेरे यांना मावळात चमत्कार घडेल, अशी खात्री वाटत आहे. तूर्त अंदाज बांधणे एवढेच आपल्या हाती आहे. चार जूनला निकाल कळणारच आहे… शेवटी… जो जिता वही सिकंदर!

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.