Pune : नुसते डोक्याला हेल्मेट अडकवू नका, हेल्मेटची स्ट्रॅपही बसवा

पुणे वाहतूक पोलिसांचे दुचाकी चालकांना आवाहन

एमपीसी न्यूज – वाहतुकीला शिस्त लागावी तसेच सुरक्षित वाहतूक होण्यासाठी पुणे पोलिसांकडून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. केवळ वाहतूक पोलिसांचा दंड टाळण्यासाठी अनेक दुचाकी चालकांकडून हेल्मेट केवळ डोक्यावर अडकवले जाते. यामुळे अपघात झाल्यास हेल्मेट डोक्यावरून पडते आणि प्राणांतिक धोका ओढवतो. त्यामुळे हेल्मेटची स्ट्रॅप (बेल्ट) देखील व्यवस्थित बसवावी, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमित प्रयत्न करण्यात येत आहेत. दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेक प्राणांतिक अपघात होत आहेत. मागील आठवड्यात दोन अपघात झाले असून यामध्ये दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमध्ये चालकांनी हेल्मेट घातले होते. मात्र त्याची स्ट्रॅप बसवली नव्हती. स्ट्रॅप न बसवल्यामुळे अपघात झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून हेल्मेट पडले आणि त्यात ते जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

30 एप्रिल रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास किर्लोस्कर ब्रिज कडून हडपसरच्या दिशेने जात असताना एका दुचाकीस्वार महिलेला टँकरने धडक दिली. दुचाकीस्वार महिलेने डोक्यावर हेल्मेट घातले होते. मात्र त्याची स्ट्रॅप न लावल्याने टँकरची धडक बसताच हेल्मेट डोक्यावरून बाजूला पडले. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना मंगळवारी (दि. 7 मे) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर वडगाव येथील चांदणी गार्डनसमोर घडली. यामध्ये सर्व्हिस रोडने जात असताना दुचाकीस्वाराला अज्ञात ट्रक चालकाने धडक दिली. डोक्यावरचे हेल्मेट धडक बसताच बाजूला पडले. त्यामुळे डोक्याला गंभीर इजा होऊन त्या दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला.

एका पाठोपाठ एक अशा एका आठवड्याच्या कालावधीत दोन घटना घडल्या आहेत. वाहन चालवताना हेल्मेट घालणे जेवढे महत्वाचे आहे. तेवढेच महत्वाचे त्या हेल्मेटची स्ट्रॅप बसवणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.