Pimpri : लोकसभेचा निकाल ठरविणार विधानसभा इच्छुकांच्या वाटचालीची दिशा !

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत विधानसभेसाठी चाचपणी करण्यात आली. चार महिन्यावर येऊन ठेपलेली विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक तयारीला लागले आहेत मात्र; लोकसभा निवडणुकीचा निकाल विधानसभा इच्छुकांच्या वाटचालीची दिशा ठरविणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या दोन मतदारसंघात विभागले गेले आहेत. पिंपरी आणि चिंचवड हे विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात. तर, भोसरी शिरुर लोकसभा मतदारसंघात येतो. मावळमध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यात तुल्यबळ लढत झाली. मुलगा उमेदवार असल्याने शहराचे माजी कारभारी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दादांचा मुलगा उमेदवार असल्याने अनेकांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून झोकून देत प्रचार केला. पिंपरी,चिंचवड या दोन्ही मतदारसंघातील आजी-माजी नगरसेवक प्रचारात सक्रिय होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांना मित्र पक्ष काँग्रेसची देखील साथ मिळाली.

तर, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी धुरा सांभाळली. अनेकांची नाराजी शिवसेनेसाठी शेवटपर्यंत डोकेदुखी ठरली. भाजपचे अनेक नगरसेवक प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून आले नाही.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे शिवाजीराव आढळराव आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात जोरदार लढत झाली. भोसरीतून आढळराव यांना मताधिक्य देण्यासाठी भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न केले. तर, डॉ. कोल्हे यांच्यासाठी माजी आमदार विलास लांडे, महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मेहनत घेतली. विधानसभेसाठी चाचपणी करत साखरपेरणी केली. त्यामुळे आता लोकसभेचा निकाल कोणाच्या बाजुने लागतो यावर विधानसभा इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे.

…..अशी आहे सध्याची राजकीय परिस्थिती

# शिवसेना-भाजपची युती झाल्याने कोणता मतदार संघ कोणाला सोडायचा याचा पेच
# महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार पिंपरी मतदारसंघ आरपीआयकडे; विद्यमान आमदार शिवसेनेचा
# आघाडीत चिंचवडची जागा काँग्रेसकडे, राष्ट्रवादी तेथून लढल्यास काँग्रेस कोठून लढणार ?
# शिवसेनेचा एक गट सक्रिय प्रचारापासून अलिप्त राहिला; निकालानंतर त्यांच्यावर कारवाईची शक्यता

‘हे’ आहेत विधानसभा मतदारसंघातील पक्षनिहाय संभाव्य इच्छूक

पिंपरी:- गौतम चाबुकस्वार, जितेंद्र ननावरे (शिवसेना), अमित गोरखे, सीमा सावळे, वेणू साबळे (भाजप)चंद्रकांता सोनकांबळे (आरपीआय), आण्णा बनसोडे, सुलक्षणा धर, शेखर ओव्हाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

चिंचवड: – लक्ष्मण जगताप (भाजप), भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन साठे (काँग्रेस), राहुल कलाटे, गजानन चिंचवडे (शिवसेना),

भोसरी:- महेश लांडगे, एकनाथ पवार, रवी लांडगे (भाजप), सुलभा उबाळे, इरफान सय्यद, गोविंद घोळवे (शिवसेना), विलास लांडे, दत्ता साने, जालिंदर शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.