Wakad : शहरासाठी पुढील 30 वर्षांचे पाणीपुरवठ्याचे नियोजन तयार – बारणे

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या (Wakad)झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था म्हणजेच हाउसिंग सोसायटी वाढत आहेत. त्यांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न सप्टेंबरपर्यंत सुटलेला असेल, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष (Wakad)महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनी शहरातील विविध सोसायटी यांना सदिच्छा भेट देऊन तेथील मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, महाराष्ट्र केसरी पैलवान विकी तथा विजय बनकर तसेच महायुतीचे पदाधिकारी होते.

पुनावळे येथील 7 प्लमेरिया ड्राईव्ह, पिंपळे सौदागर येथील साई पर्ल सोसायटी, कुणाल आयकॉन, रोझलँड रेसिडेन्सी, शिवसाई विश्व, चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटी, थेरगाव येथील ग्रीन्स सोसायटी आदी ठिकाणी आयोजित बैठकांना बारणे यांनी हजेरी लावली.

बहुतेक सोसायट्यांमध्ये सदस्यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बारणे यांनी पुढील 30 वर्षांचे पाणीपुरवठ्याचे नियोजन सांगितले. आपण स्वतः लोक सहभागातून गेली आठ वर्षे पवना धरणातील गाळ काढत आहोत. त्यामुळे धरणात एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा आता वाढला आहे. शहराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी रावेत ऐवजी शिवणे बंधाऱ्यातून पाणी उचलण्याचे नियोजन आहे.

आंध्रा धरणातून मंजूर झालेल्या 265 पैकी 100 दशलक्ष लिटर पाणी लवकरच उपलब्ध होणार असल्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती दूर झालेली असेल. या व्यतिरिक्त टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून महायुती सरकारने पाच टीएमसी पाणीसाठा पिंपरी- चिंचवडला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पुढील 30 वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून मतदार संघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती त्यांनी दिली. देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावे. मावळा धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत आहे, असे सांगत त्यांनी मतदारांना आवाहन केले.

Talegaon Dabhade : नीट परीक्षेमुळे परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी; तळेगाव-चाकण मार्गावर वाहतूक कोंडी

चिंचवड मतदारसंघातून बारणे यांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही आमदार अश्विनी जगताप यांनी दिली. दिवंगत लोकनेते लक्ष्मण जगताप यांचा शब्द चिंचवडचे मतदार खाली पडू देणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

पुनावळे येथील 7 प्लमेरिया ड्राईव्ह सोसायटीत झालेल्या बैठकीस संदेश लाड, शिवराज हराळे, उपेंद्र खांबेटे, रामकृष्ण ढोले, अशोक गायकवाड उपस्थित होते. साईपर्ल सोसायटीत अजित शेवाळे, परेश महाजन, हर्षल गिरीकुंजे, रुपेश सैनी यांनी बारणे यांचे स्वागत केले. कुणाल आयकॉन सोसायटीमध्ये नरेंद्र देसाई जयंत बाहुलेकर, राजेश पाटील, सुप्रिया पाटील यांनी बारणे यांचा सत्कार केला. रोझलँड रेसिडेन्सीमध्ये सोसायटीचे अध्यक्ष संदीप ठेंगरे यांनी तर शिवसाई विश्व सोसायटीत अध्यक्ष अनंत चौधरी यांनी सदस्यांच्या वतीने बारणे यांना शुभेच्छा दिल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.