Talegaon Dabhade : नीट परीक्षेमुळे परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी; तळेगाव-चाकण मार्गावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी (दि. 5) देशभरात पार पडली. या परीक्षेसाठी तळेगाव-चाकण रोडवरील माऊंट सेन्ट हायस्कूलमध्ये केंद्र आले होते. राज्याच्या विविध भागातून पालक आपल्या पाल्यांना परीक्षेसाठी घेऊन आले. मात्र पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश नसल्याने पालकांनी रस्त्याच्या दुतर्फा दिसेल तिथे आपली वाहने पार्क केली.

 

त्यामुळे तळेगाव-चाकण मार्गावर काही तासांकरिता वाहतूक ठप्प झाली. याचा स्थानिक नागरिक, वाहनचालकांना नाहक(Talegaon Dabhade) त्रास झाल्याचे समजते.

नीट परीक्षेसाठी तळेगाव दाभाडे शहर परिसरात एकच केंद्र होते. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होत असल्याने राज्याच्या विविध भागातील विद्यार्थ्यांचे या परीक्षा केंद्रावर नंबर आले होते. राज्यातील लातूर, नाशिक, अहमदनगर, बारामती, दौंड, सातारा, सांगली अशा विविध ठिकाणावरून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. रविवारी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे यासाठी विद्यार्थी व पालकांनी तळेगाव येथे आदल्यादिवशीच मुक्काम केला होता.

परीक्षेची वेळ दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत होती. त्यामुळे सकाळी साडे नऊ-दहा वाजलेपासूनच विद्यार्थी व पालक परीक्षा केंद्रावर आले होते. शालेय व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांखेरीज परीक्षेच्या नियमाचे कारण देत पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश नाकारला. परीक्षा केंद्राच्या जवळपास वाहन लावण्यासाठी वाहनतळ नसल्याने पालकांनी रस्त्याच्या दुतर्फा जिथे जागा दिसेल तिथे आपली वाहने पार्क केली.

तळेगाव-चाकण हा मार्ग अतिशय रहदारीचा आहे. तळेगाव, चाकण औद्योगिक वसाहतींना मुंबई शहराशी जोडणारा मार्ग असल्याने या मार्गावर कायम अवजड वाहतूक सुरु असते. त्यात तळेगाव येथे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लागल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद झाला. सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तळेगाव येथील वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी करून वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले आहे.

Maval : सर्जनशीलतेचा विद्यार्थ्यांनी ध्यास घ्यावा – कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.