Talegaon Dabhade :कलापिनी हास्य योगाचे 21 व्या वर्षात पदार्पण. रंगतदार कार्यक्रमाने रंगला 20 वा वर्धापन दिन !

Talegaon Dabhade : जागतिक हास्य दिनाच्या दिवशी कलापिनी  हास्य योगाचे २१ व्या वर्षात पदार्पण झाले. यानिमित्ताने यंदाच्या वर्षी ‘ महाराष्ट्राची लोकधारा ‘ हा महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारा सुरेख कार्यक्रम कलापिनी कलामंडळतर्फे(Talegaon Dabhade) सादर करण्यात आला.

कलापिनी कलामंडळ दरवर्षी स्वास्थ्ययोगी  वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या वर्षी ‘ महाराष्ट्राची लोकधारा ‘ हा महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारा सुरेख कार्यक्रम सादर केला.

“गोड आवाजातील जात्यावरच्या ओव्या, हातात कंदील घेऊन ‘ पिंगळा महाद्वारी ‘ म्हणत येणारा पिंगळा, मोरपिसांची टोपी घालून हाती चिपळ्या घेऊन नाचत येणारा वासुदेव, लगबगीनं शेतावर जाणारा बळीराजा, सडा रांगोळी करणाऱ्या,  तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालणाऱ्या महिला, गोठ्यात आतूरतेने पाठीवर प्रेमाने हात फिरविणाऱ्या मालकाची वाट पाहणारी पांढरीशुभ्र कपिला आणि सर्वांनाच गाईची धार काढून  ताजे, निरसं दूध देणारे गवळीकाका, वातावरणात प्रसन्नता आणणारी’ घनश्याम सुंदरा ‘ या भूपाळीचे अवीट स्वरात तसेच सुंदर निर्मळ दृष्य कलापिनीच्या प्रांगणात सादर केले”.

या भूपाळीला प्रेक्षकांनी उस्फुर्तपणे टाळ्यांनी दाद दिली. उपस्थित सर्व प्रेक्षक भारावलेल्या नजरेने(Talegaon Dabhade) हा क्षण टिपत होते.

या कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन झाले. त्यानंतर लावण्या शेलार नववीतील विद्यार्थीने गणेश वंदना अतिशय सुंदर सादर केली. यशवंतनगर हास्यसंघाने ‘ हास्य योगाला चला तुम्ही ‘ हे भारुड, वतननगर हास्यसंघाने ‘ माऊली माऊली ‘ हे भक्तिगीत, सासर-माहेर हास्यसंघाने हिंदी सिनेगीतांवर छान समूह नृत्य केले.या कार्यक्रमांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

कलापिनी स्वास्थ्ययोगाने  ‘ महाराष्ट्राची लोकधारा ‘ यामध्ये ओवी, पिंगळा,  वासुदेव, भूपाळी,पयलं नमन,  विजय पताका श्रीरामाची  हे भक्तिगीत,’एकविरा आई तू ‘हे कोळी गीत , रखुमाई रखुमाई हे गाणे, सत्वर पावं ग मला हे भारुड, यळकोट यळकोट जय मल्हार…गोंधळ व रेशमाचे रेघांनी ही ठसकेबाज लावणी असे एक से एक सुंदर कार्यक्रम सादर करुन धमाल उडवून दिली.

‘ सात आठ नऊ दहा, जेष्ठ झाले तरुण पहा’ या हास्य योगातील घोषणेप्रमाणे तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने सर्व संघांनी उत्तम सादरीकरण केले. कलेला वयाचे बंधन नसते याची प्रचिती आली.

         

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणपतराव काळोखे गुरुजी ( वय 92 वर्षे ), श्रीकृष्ण मुळे (वय 75 वर्षे ) आणि जेष्ठ विचारवंत लेखक डॉ. शाळीग्राम भंडारी हे उपस्थित होते. कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे , उपाध्यक्ष अशोक बकरे यांचे हस्ते मान्यवरांचे आणि उपस्थित हास्यसंघांचे प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आले.

सर्व मान्यवरांनी हास्य योगी कलाकारांचे कलापिनीच्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक अशोक बकरे यांनी तर अहवाल वाचन पांडुरंग देशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा कोण्णूर व दिप्ती आठवले यांनी अतिशय छान केले. प्रेक्षकांची उपस्थिती प्रचंड होती. प्रवेशद्वाराशी सुंदर रांगोळी आणि स्वास्थ्ययोगाचे द्विदशकातील कार्यक्रमांच्या निवडक फोटोंचे प्रदर्शन लावले होते.

हा सोहळा यशस्वी होण्यासाठी रश्मी पांढरे, रेखा रेंभोटकर,किसन शिंदे, सुरेश भोईर व सर्व हास्य योगी यांचा सहभाग होता.

Talegaon :कलापिनी कलामंडळ 2024-25 चा शुभारंभ संकर्षण कऱ्हाडेच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाने

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.