Pune : राजस हौसिंग सोसायटीचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

एमपीसी न्यूज- कात्रज परिसरातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठ्या राजस सहकारी गृहरचना संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.  या निमित्त मंगळवारी (दि. 7) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर आमदार योगेश टिळेकर, कोंढवा येवलेवाडी प्रभाग समिती अध्यक्षा मनीषा कदम, नगरसेवक प्रकाश कदम, नगरसेविका राणीताई भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम, रायबाशेठ भोसले, ज्येष्ठ विधिज्ञ प्रमोद बेंद्रे, सोसायटीचे सीए कुंदन शिंदे, श्री ढवळे, उत्कर्ष सोसायटीचे अध्यक्ष संभाजीराव खोपडे, राजस सोसायटीचे अध्यक्ष हेमंत धायबर, उपाध्यक्ष शामराव मोहिते, सचिव दुष्यंत घाटगे, खजिनदार शंकरराव बेलगुडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्रेया गंधे हिने गायलेल्या स्वागतगीताने झाली. यावेळी राजस सोसायटीच्या आवारात उभ्या केलेल्या ओपन जिमचे उदघाटन आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उदघाटन कोंढवा येवलेवाडी प्रभाग समिती अध्यक्षा मनीषा कदम व नगरसेविका राणी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीच्या सुवर्णमहोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण नगरसेवक प्रकाश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार योगेश टिळेकर यांनी आमदार निधीमधून संस्थेतील विकासकामांसाठी भरीव तरतूद करण्याचे आश्वासन दिले. तसेच भविष्यात सोसायटीच्या समोरील अडचणी सोडविण्याची ग्वाही दिली. नगरसेवक प्रकाश कदम तसेच ज्येष्ठ विधिज्ञ प्रमोद बेंद्रे यांनी राजस सोसायटीच्या कामकाजाबाबत कौतुक करून संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सोसायटीमधील ज्येष्ठ सभासद हनुमंत कुदळे यांनी सोसायटीच्या स्थापनेपासूनचा इतिहास मांडला तर सोसायटीमध्ये भविष्यात होऊ शकणाऱ्या विविध योजना, उपक्रमांबाबत सोसायटीचे सभासद विकास खुटवड यांनी माहिती दिली.

हेमंत धायबर यांनी आगामी सुवर्ण महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली तसेच संस्थेच्या ५० वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला.

सूत्रसंचालन सचिव दुष्यंत घाटगे यांनी केले तर आभार कार्यकारिणी सदस्या रत्नप्रभा स्वामी यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप श्री. शामगावकर यांनी गायलेल्या पसायदानाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेन्द्र जाधव, मधुकर जमदाडे, दत्तात्रेय देवरे, ज्योती कुलकर्णी, सौ. देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.