Chinchwad : गुन्हेगारासोबत प्रेम विवाह केल्याने चुलत्याकडून पुतणीचा खून

Chinchwad : गुन्हेगारासोबत प्रेम विवाह केल्याने चुलत्याकडून पुतणीचा खून

एमपीसी न्यूज – गुन्हेगारासोबत घरच्यांच्या परस्पर प्रेम विवाह केला. विवाहानंतर घरच्यांची इच्छा नसताना माहेरी येऊन भांडण करणा-या पुतणीचा चुलत्याने नाडीने गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 22) रात्री दहाच्या सुमारास दळवीनगर चिंचवड येथे घडली.

ऋतुजा विकी वाघ असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. संतोष रोहिदास भोंडवे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी छाया विलास भोंडवे (वय 40, रा. दळवीनगर चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजाने काही दिवसांपूर्वी एका गुन्हेगारासोबत प्रेमविवाह केला होता. यामुळे कुटूंबाची नाहक बदनामी झाल्याचा राग संतोषच्या मनात होता. प्रेमविवाह झाल्यानंतर ऋतुजा माहेरी यायची. आई आणि आजी तू इथे येत जाऊ नकोस असे सांगायचे. परंतु ती ऐकायच्या मनस्थिती नसायची. यामुळे अनेकदा वाद होऊन ऋतुजाने आईला मारहाण केली होती. ऋतुजा मोठ्या व्यक्तींचा सन्मान करत नव्हती.

शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ऋतुजा आईकडे आली होती. हे आई आणि आजीला आवडल नव्हतं. तेव्हा तिचे आई आणि आजीसोबत बाचाबाची होऊन किरकोळ भांडण झाले. तू गुन्हेगारासोबत प्रेम विवाह केल्याने आमची बदनामी झालेली आहे, तू इकडे येऊ नकोस असे म्हटल्यानंतर ऋतुजाने आईला मारहाण केली.

गुन्हेगारासोबत प्रेमविवाह केल्याने घराची अब्रू, सन्मान गेल्याचा राग संतोषच्या मनात होता. ऋतुजाचे तिच्या आई आणि आजीसोबत भांडण झाल्यानंतर संतोषने ऋतुजा आणि तिच्या आजीला बाहेर काढले. संतोषने ऋतुजाच्या बेडरूममध्ये जाऊन नाडीने गळा आवळून ऋतुजाचा खून केला. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात ऋतुजाची आई छाया यांनी गुन्हा नोंदवला. चिंचवड पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.