Pimpri : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घराचा ताबा तात्काळ द्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – ‘‘सर्वांसाठी घरे’’ या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘प्रधानमंत्री आवास योजना’’ देशभरात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे योजनेबाबत शहरवासीयांमध्ये नकारात्मक संदेश जात आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घराचा ताबा तात्काळ द्यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

Pimpri : रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी

याबाबत महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी येथे प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. प्रशासनाने लाभार्थी निश्चित केले आहेत. त्यांचे कर्ज मंजूर झाले आहे.

अनामत रक्कम लाभार्थींनी भरलेली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थींना सदनिकांचा ताबा मिळणे अपेक्षीत होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि काहीअंशी अपूर्ण कामामुळे सदनिकांचा ताबा दिला जात नाही. त्यामुळे लाभार्थींमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर आहे.

त्यामुळे चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचे काम पाहणारे प्रधानमंत्री आवास योजनेचे संबंधित अधिकारी, लाथार्थींचे शिष्टमंडळ यांच्याशी माझ्या समक्ष बैठक घेण्याचे नियोजन करावे. या बैठकीला महापालिकेचा संबंधित जबाबदार अधिकारी उपस्थित असावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

‘प्रधानमंत्री आवास’ योजनेतील संबंधित लाभार्थी आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून लाभार्थींना तातडीने सदनिकांचा ताबा देण्याबाबत आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनेबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होवू नये, अशी अपेक्षा आहे.

गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या घरांचा ताबा निर्धारित वेळेत मिळावा आणि प्रशासनाबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होवू नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना केली असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.