Loksabha Election : पुणे आणि मावळ मतदार संघात ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये ( Loksabha Election ) आज (सोमवार, दि. 13) मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना सकाळच्या वेळेत काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले.

 

छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी 25 मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएम बंद पडले. त्यामुळे मतदारांना ताठकळत थांबावे लागले. तर बीड लोकसभा मतदारसंघातील परळी येथे एका केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या.

 

पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी भागात एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. पुणे इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली. नवीन ईव्हीएम आणून इथली मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली आहे.

Maval LokSabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांनी बजाविला मतदानाचा हक्क

 

मावळ लोकसभा मतदारसंघात मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे गणेश मोफत वाचनालय या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मध्ये बिघाड झाला. तांत्रिक अडचणीमुळे काही वेळ ईव्हीएम बंद पडले होते. काही वेळेत ते पुन्हा सुरू करण्यात आले. मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळेतच हा प्रकार घडला. प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेमुळे मतदानावर फारसा परिणाम झाला नाही.

 

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्या वेळी 24 बॅलेट युनिट, 8 कंट्रोल यूनिट आणि 24 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. शिरूर लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्या वेळी 24 बॅलेट युनिट, 6 कंट्रोल यूनिट आणि 14 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी ( Loksabha Election ) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.