Makar Sankranti : संक्रांतीच्या दिवशी दुचाकी चालवताना विशेष काळजी घ्या

एमपीसी न्यूज – पतंगाच्या नायलॉन चीनी मांजामुळे दुखापत होऊन मृत्यू होण्याच्या ( Makar Sankranti) अनेक घटना संक्रांतीच्या दरम्यान घडतात. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी दुचाकी चालवताना विशेष काळजी घ्यायला हवी. उच्च न्यायालयाने नायलॉन मांजा विक्री आणि वापरण्यावर बंदी घातलेली असताना देखील मांजाची विक्री आणि त्याचा वापर बंद झालेला नाही.

रस्त्याने जाताना एखादा वाहन चालक नायलॉन मांजात अडकतो आणि क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. त्यामुळे नायलॉन मांजा म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा येतो. अनेकांनी या नायलॉन मांजामुळे जीव गमावला आहे. अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. तर काहीजण थोडक्यात बचावले आहेत. संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्यासाठी बंदी असलेला नायलॉन मांजा चोरून वापरला जातो.

Ravet : रावेत येथे उभारणार स्वतंत्र अग्निशमन केंद्र

पतंग उंच उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरला जातो. पतंग उडवताना मांजा तुटल्यानंतर तो रस्त्यावर, झाडांवर गुंडाळला जातो. रस्त्यावर पडलेला मांजा काढण्याचे कष्ट संबंधितांकडून घेतले जात नाहीत. त्यामुळे तो अतिशय घातक ठरतो. रस्त्यावरून जाणारा वाहन चालक त्या मांजात अडकल्यास मोठी इजा होते. काहीजण त्यात जीव देखील गमावतात.

माणसांना नायलॉन मांजा दिसला तर काय खबरदारी घ्यावी हे समजू शकते. मात्र पशु-प्राण्यांचे तसे नाही. त्यामुळे अनेक पक्षी झाडांवर अडकलेल्या मांजात अडकतात. अन्नपाण्यावाचून अडकलेल्या पक्ष्यांचा झाडावरच मृत्यू होतो. मांजात कापून अनेक प्राणी गंभीर जाक्मी झाले आहेत. काही घटना उघडकीस आल्यानंतर अग्निशमन दलाकडून पक्ष्यांची सुटका केली जाते. अग्निशमन दलाने आजवर नायलॉन मांजात अडकलेल्या अनेक पक्षी आणि प्राण्यांची सुटका केली आहे. पण त्यांच्यावर या मांजाची टांगती तलवार कायम आहे.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांकडून पतंग महोत्सव भरवले जातात. या महोत्सवात पतंग उंच उडवण्यासह एकमेकांचा पतंग कापण्याची शर्यत लावली जाते. अशा वेळी आपला पतंग कापला जाऊ नये यासाठी नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतो. कापलेला मांजा परत जमा केला जात नाही. तोच मांजा भविष्यात जीवघेणा ठरतो. त्यामुळे पतंग महोत्सवात नायलॉन मांजाला बंदी घालणे आवश्यक आहे. जर कोणी वापरला तर त्या स्पर्धकास स्पर्धेतून बाद करण्याची कारवाई करायला हवी.

शहरात सर्रास नायलॉन मांजाची विक्री होते. मात्र नायलॉन मांजाला बंदी असल्याने लपून छपून याची विक्री केली जाते. एखाद्या ग्राहकावर संशय आल्यास त्याला नायलॉन मांजा विकला जात नाही. काही रुपयांच्या नफ्यासाठी दुकानदार अशा प्रकारे बेकायदेशीर मांजाची विक्री करताना आढळतात.

दुचाकी चालवताना काळजी घ्या

दुचाकी चालवताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. नायलॉन मांजा सहज नजरेस पडत नाही. पतंग तुटल्यानंतर मांजा रस्त्यावर आणि इतरत्र तसाच पडलेला असतो. त्यामुळे तो दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो. दुचाकीला समोरच्या बाजूला स्टीलचे रॉड लावण्याचा उपाय सध्या सर्वत्र केला जात आहे. त्यामुळे दुचाकीसमोर येणाऱ्या मांजाने स्टीलच्या रॉडमुळे धोका निर्माण होणार नाही. वाहने सावकाश आणि काळजीपूर्वक चालवणे या काळात फार गरजेचे आहे.

उच्च न्यायालयाने दिले कारवाईचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नायलॉन मंजाच्या विक्रीबाबत गंभीर दखल घेतली आहे. बंदी असलेला मांजा जप्त करण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करावेत, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांच्या खंडपीठासमोर नायलॉन मंजाच्या विक्रीबाबत एक खटला सुरु होता. त्या खटल्याचा निकाल देताना त्यांनी याबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांनी राज्यभर कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश दिले. तसेच पोलिसांकडून होत असलेल्या किरकोळ कारवायांबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. दुकान, घर, मैदान जिथे मांजा सापडेल ते ठिकाण सील करा. लहान मुलांनी मांजाची माहिती लपवल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हे नोंदवा. घरावर पतंग उडवणाऱ्यांविरोधात मालकांना विचारून कारवाई करा. औद्योगिक कारणासाठी नायलॉन मांजाचा वापर होतो, अशी सबब आता चालणार नाही असे खंडपीठाने म्हटले आहे.

कठोर शिक्षेची तरतूद

नायलॉन मांजा विक्री केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातात. भारतीय दंड संहिता कलम 188 (शासनाने दिलेल्या आदेशाचा भंग करणे) नुसार सहा महिन्यांपर्यंत कारावास अथवा एक हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कलम 336 (इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे) नुसार गुन्हा दाखल केला जातो. त्यामध्ये तीन महिन्यापर्यंत कारावास अथवा अडीचशे रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये पाच वर्षापर्यंत कारावास अथवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ ( Makar Sankranti) शकतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.