Pune Metro : जिल्हा न्यायालयाच्या आवारात मेट्रो स्टेशन उभारण्यासाठी प्राधिकरणाला जागा मिळाली

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात मेट्रो स्टेशन (Pune Metro) उभारण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) अखेर जागा मिळाली. या स्टेशनसाठी आणि जिन्यासाठी आवश्यक असलेली 1150.66 चौरस मीटर जागा प्राधिकरणास हस्तांतर करण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई यांची बिल्डींग कमिटी यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा न्यायालय व पीएमआरडीए यांच्या दरम्यान नुकताच करारनामा स्वक्षांकित करण्यात आला असल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.
पीएमआरडीएच्या माध्यमातून हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो लाईन 3 हा प्रकल्प राबवला जात आहे. सुमारे 23 किलोमीटर अंतराचा हा मेट्रो मार्ग असणार आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरासाठी एक स्टेशन उभारण्यात आले आहे. राज्य शासनाने सन 2018 मध्ये हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित केला आहे.

मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीला प्राधिकरणाने 100 टक्के जमीन भूसंपादन करून देणे आणि विविध परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. कार डेपो, कास्टिंग यार्ड आणि मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या एकूण जागेपैकी 97.75 टक्के जागा कंपनीला हस्तांतरित करण्यात आली आहे.

 

जिल्हा न्यायालयाच्या आवारात मेट्रो स्टेशनचा जिना उभारण्यासाठी जागेची आवश्यकता होती. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची बिल्डींग कमिटी आणि पीएमआरडीए यांच्यात करार होऊन मेट्रोसाठी 1150.66 चौरस मीटर जागा देण्यात आली (Pune Metro) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.