Maval LokSabha Election : उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तीन टप्प्यात तपासणी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघ  निवडणूकीच्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोग यांचे कार्यालय, निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक तपासणी केली जात आहे. उमेदवारांच्या  दैनंदिन खर्चाच्या विविध तपासण्या करण्यासाठी  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील पाचव्या मजल्यावरील निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी दैनंदिन खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी तपासणी खर्चाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ही तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे नियंत्रण करण्यात येत आहे. दरम्यान, उमेदवारांच्या  दैनंदिन खर्चाची पहिली दि. 3  मे रोजी तर दुसरी तपासणी दि. 7 मे रोजी तर  तिसरी तपासणी दि. 11 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या विहित वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा निवडणूक खर्च देखरेख पथक प्रमुख पद्मश्री तळदेकर यांनी दिली. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना  तळदेकर यांनी उमेदवारी खर्चाबाबत सविस्तर माहिती(Maval LokSabha Election) दिली.

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथे याबाबतची बैठक पार पडली. या बैठकीस निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मतराव खराडे, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार अभिजीत जगताप, मनिषा तेलभाते, सचिन मस्के, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या खर्च तपासणी पथक प्रमुख अश्विनी मुसळे, सविता नलावडे तसेच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी(Maval LokSabha Election) उपस्थित होते.

उमेदवारांच्या खर्चाच्या तीनही तपासण्या निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे करण्यात येत असून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा तसेच निवडणूक कामकाजाकरिता उमेदवाराने दररोज केलेल्या खर्चाचा तपशील, बँक पासबूक व सर्व देयकांच्या मूळ पावत्यांसह खर्च सादर करावा, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सर्व उमेदवारांना दिल्या आहेत. तपासणी दिनांका दिवशी उमेदवार अथवा  त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, तपासणी वेळी दैनंदिन खर्चाची नोंदवही अद्ययावत नोंदवून तपासणीसाठी सादर करावी, अनुषंगिक कागदपत्रे सोबत आणावीत, अशा सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या. तपासणी दिनांकादिवशी अनुपस्थित राहिल्यास अथवा खर्चामध्ये तफावत असल्यास संबंधितांवर नियमाधिन कारवाई केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उमेदवारांचा निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने माहिती घेत असून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा 95 लाख रूपये इतकी आहे. मतदार संघामध्ये एकूण 33 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. खर्च तपासणी पथक प्रमुख अश्विनी मुसळे आणि त्यांच्या पथकाकडून हे काम केले जात असून त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक म्हणून सविता नलावडे  यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.