Mumbai : काळ्या काचा लावलेल्या वाहन चालकांवर कारवाई करा; अपर महासंचालकांचे आदेश

एमपीसी न्यूज – वाहनांच्या विंडस्क्रीन आणि खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म व अन्य रंगबिरंगी फिल्म लावलेल्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी राज्य पोलिसांना दिले आहेत. याबाबतचा आदेश त्यांनी नुकताच पारित केला आहे.
वाहनांच्या विंडस्क्रीन आणि खिडक्यांच्या काचेवर लावण्यात येणा-या फिल्म काढण्याबाबत अविषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची सुनावणी 24 एप्रिल 2012 रोजी करताना सर्वोच्च न्यायालयाने अशा काचांवरील फिल्म काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात पोलीस महासंचालकांनी वाहनांच्या विंडस्क्रीन आणि खिडक्यांच्या काचांवर लावण्यात येणा-या काळ्या फिल्म काढून टाकण्याबाबत तसेच अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
राज्यातील पोलिसांना याबाबत आदेश दिले होते. सात वर्षानंतर देखील राज्यात काळ्या फिल्म लावलेली वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. काळ्या फिल्म व काळ्या काचा लावलेली खाजगी, शासकीय व निमशासकीय वाहने आजही राजरोसपणे रस्त्याने फिरतात. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
महत्वाच्या आणि अतिमहत्वच्या व्यक्तींना सुरक्षेच्या कारणास्तव झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आलेल्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांतून सूट देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने काही वाहनांना सवलत दिली आहे. त्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांवर कारवाई करावी, असे आदेश राज्यातील पोलिसांना देण्यात आले आहेत.

Show quoted text

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.