PCMC : शहरातील 34 हजार फेरीवाल्यांना ‘पीएम स्वनिधी’

एमपीसी न्यूज –  शहरातील 2011 च्या जनगणेतील 17 लाख लोकसंख्येनुसार34  हजार 554 फेरीवाले गृहीत धरण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने महापालिकेला या सर्व फेरीवाल्यांना पीएम स्वनिधीचा लाभ देण्याचे उदि्दष्ट दिले आहे. पालिकेने आतापर्यंत 16 हजार 65 फेरीवाल्यांना स्वनिधीचा लाभ मिळवून दिला आहे.

शहरी भागातील फेरीवाल्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. सन 2020 मध्ये सरकारने फेरीवाल्यांसाठी पीएम स्वनिधी ही योजना आणली. या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना प्रथम 10 हजार, दुसऱ्यांदा 20 हजार आणि कर्जाची वेळेवर परतफेड केल्यानंतर तिसऱ्या वेळी 50 हजार रुपयांचे कर्ज अल्प व्याजदरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कर्जाची केंद्र सरकार हमी घेत आहे. फेरीवाल्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

Pimpri : नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्यछटा स्पर्धेत भरघोस प्रतिसाद

पालिकेचे शिफारस पत्र आणि आधार कार्ड या कागदपत्रांवर सहज कर्ज मिळत आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील 25 हजार 85 फेरीवाल्यांना कर्जासाठी शिफारस पत्रे मंजूर केली आहेत. आतापर्यंत 13 हजार 569 जणांना 10 हजार, 2 हजार 385 जणांना 20 हजार तर 102 जणांना 50 हजार अशा 16 हजार 56 जणांना पीएम स्वनिधीचा लाभ देण्यात आला आहे.

भाजी विक्रेत्यालाही लाभ

भूमी आणि जिंदगी विभागाने शहरातील फेरीवाल्यांचे केलेल्या सर्वेक्षणात 19 हजार फेरीवाले असल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र सरकारने लोकसंख्येच्या मानांकनानुसार 34 हजार 554  फेरीवाले असल्याचे गृहीत धरून त्यांना पीएम स्वनिधीचा लाभ देण्याची सूचना केली आहे.

एखादी व्यक्ती मार्केटमध्ये अथवा रस्त्यावर भाजी विकत असेल, तर त्यांनाही फेरीवाले म्हणूनच गृहीत धरून पीएम स्वनिधीचा लाभ देण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार 17 ऑगस्टपासून शहरातील बाजारपेठा, महाविद्यालय परिसर, समाज मंदिरात कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.