Pimpri News: वृक्षतोडीमागे मोठे ‘रॅकेट’? प्रशासनातील ‘पुष्पा’चा शोध घ्या!

एमपीसी न्यूज – हरीतनगरी अशी ओळख असलेल्या (Pimpri News) पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वृक्षतोड सुरु आहे. विशेष म्हणजे वृक्षतोडीप्रकरणी पालिकेचे दोन असिस्टंट हॉर्टी सुपरवायझर, दोन उद्यान सहाय्यक निलंबित आहेत. ज्यांच्यावर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आहे, तेच वृक्षतोडी प्रकरणी निलंबित झाल्याने रक्षकच वृक्षांच्या मुळावर उठलेत का? असा सवाल करत प्रशासनातील ‘पुष्पा’चाच शोध घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. वृक्षतोडीमागे मोठे रॅकेट असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने बघावे, अवैध वृक्षतोडी प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची मागणी वृक्षप्रेमींनी केली.

पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अंमलात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षांचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्रोपन करणे पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. परंतु, उद्यान विभागाकडून फांदी छाटण्याची, 1 ते 2 झाडे तोडण्याची परवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात परवानगीपेक्षा अधिक झाडांची कत्तल केली जात असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. ही वृक्षतोड उद्यान विभागाच्या आर्शिवादानेच होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने केला जातो. वृक्षतोडीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसते. कारण, बेकायदेशीरपणे झालेली वृक्षतोड पर्यावरणप्रेमींना प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी लागते. त्यानंतर कारवाईचा फार्स केला जातो. प्रकरण लावून धरल्यानंतर कुठे गुन्हा दाखल केला जातो. अन्यथा केवळ फार्स करुन सोडले जाते. त्यामुळे (Pimpri News) पर्यावरण प्रेमींच्या आरोपांनाही पुष्टी मिळते.

पिंपरी-चिंचवड शहर हे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने पुण्याचे जुळे शहर म्हणून ओळखले जाते. पिंपळ, चिंच आणि वड या वृक्षांच्या नावांनी बनलेले हे शहर उद्योगनगरी म्हणून नावलौकिकास आले. त्यामुळे शहरीकरण वाढत गेले आणि हळूहळू वृक्षसंपदा कमी होत सिमेंटची जंगले उभी राहली आहेत. जेवढी वृक्षसंपदा उरली आहे किमान तिचे तरी जतन चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे असताना रक्षकच भक्षक बनताना दिसत आहेत. ठेकेदार आणि काही कर्मचारीच वृक्ष तोडीमध्ये सहभागी असल्याचे वारंवार दिसून येते.

वृक्षतोडीप्रकरणी उद्यान विभागातील चौघे निलंबित!

महापालिकेच्या नेहरुनगर हॉकी स्टेडियम येथील वृक्षांची वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वृक्षतोड आणि चार वृक्षांची बेकायदेशीरपणे खासगी यंत्रणेमार्फत तोड करुन लाकडे गायब करणा-या महापालिकेच्या असिस्टंट हॉर्टी सुपरवायझरला 15 जुलै रोजी सेवा निलंबित केले. निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानातील विनापरवाना वाळलेले वृक्ष काढणे, वृक्षाच्या फांद्या तोडणे आणि चिंचवड दत्तनगर उद्यानामधील वृक्षांच्या तोडणी, गुन्हा दाखल न करता लाकडे नर्सरीमध्ये जमा करुन वाहन सोडल्याप्रकरणी असिस्टंट हॉर्टी सुपरवायझर संजीव राक्षे, उद्यान सहाय्यक मच्छिंद्र कडाळे, भरत पारखी यांना 18 नोव्हेंबर रोजी सेवानिलंबित करुन त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु केली आहे. वृक्षतोडीप्रकरणी उद्यान विभागातील चौघे जण निलंबित आहेत. याचाच अर्थ प्रशासनातील लोकही वृक्षतोडीत सहभागी असतात. या कर्मचा-यांना केवळ निलंबित केले जाते. पण, फौजदारी कारवाई टाळली जाते.

Rapido Pune : पुण्यातील 57 हजार रॅपीडो कॅप्टनचा पण विचार करा; रॅपीडो व्यवस्थापनाने सोडले मौन

राजकीय लोकांचे मौन आश्चर्यकारक?

पिंपरी-चिंचवड शहरात सातत्याने होणा-या अवैध वृक्षतोडीबाबत लोकप्रतिनीधी आवाज उठवत नाहीत. शहराच्या सर्वच भागात बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल केल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. पण, राजकीय लोक त्याविरोधात ठोस भूमिका घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबतही संशयाचे वातावरण निर्माण होते. वृक्षतोडीला अनेक राजकीय लोकांचेही पाठबळ असल्याचे दिसते. वृक्षतोड करणारे ब-यापैकी ठेकेदार हे निगडी भागातीलच आहेत, याचे कोडे उलगडत नाही.

अवैध वृक्षतोडीला प्रशासनाचेच पाठबळ – राऊळ

वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरात होणा-या अवैध वृक्षतोडीत महापालिकेच्या उद्यान विभागाचे लोक सहभागी आहेत. तक्रारी करुन कार्यवाही केली जात नाही. गुन्हे दाखल होत नाही. परस्पर दंड आकारुन प्रकरणे मिटवली जात आहेत. वास्तविक पाहता दंड करुन प्रकरणे मिटविण्याचे कोणतेही अधिकार महापालिकेला नाहीत. पालिकेने थेट गुन्हे दाखल केले पाहिजेत. अवैध वृक्षतोड झाल्यानंतर किती दंड वसूल करायचा अशी निमयमावली करायचे चालले असल्याचे कळते. असे करुन अवैध वृक्षतोडीला पाठबळ दिले जाईल. महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 या निमयाचे उल्लंघन आहे”.

वृक्षतोडी प्रकरणी कठोर कारवाई, वृक्ष पुनर्रोपनावर भर; अतिरिक्त आयुक्त जांभळे

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे म्हणाले, ”वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी अवैध वृक्षतोड करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अवैध वृक्षतोडीत सहभागी असलेल्या पालिकेच्या चार कर्मचा-यांना निलंबित केले आहे. यापुढे वृक्षतोडीबाबत जे प्रस्ताव येतील. त्याची व्यवस्थित पडताळणी केली जाईल. वृक्षाची तोड करावीच लागते असे नाही, त्यासाठी वृक्ष पुनर्रोपनावर भर राहील. परवानगी देतानाही काळजी घेतली जाईल. वृक्षतोड कमीत-कमी होईल, याची दक्षता घेण्यात येते. बांधकाम प्रकल्प यासह कशासाठीही वृक्षतोड करायचीच नाही अशी महापालिकेची भूमिका आहे. वृक्षतोडीऐवजी पुनर्रोपन केले जाईल. वृक्षतोडीत महापालिका कर्मचा-यांचा सहभाग आढळल्यास यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.