Pimpri : नितीन गडकरी येत्या गुरुवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

रामकृष्ण मोरे यांच्यावरील ग्रंथाचे करणार प्रकाशन

एमपीसी न्यूज –  येत्या  गुरुवारी ( दि.29 )केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांचा पिंपरी चिंचवड शहर दौरा असणार आहे.शहराच्या विकासाचे शिल्पकार ठरलेले प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथाच्या प्रकाशनासाठी  ते शहरात (Pimpri)  येत आहेत.

रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठान व अंशुल प्रकाशन यांच्या वतीने आकुर्डी येथील पीसीसीओई कॉलेजच्या सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


पत्रकार व लेखक विजय जगताप यांनी लिहिलेल्या व संपादन केलेल्या या ग्रंथामध्ये प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार व सांस्कृतिक कार्याचा वेध घेण्यात आला असून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री असताना त्यांनी घेतलेले ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय, विधिमंडळातील त्यांची गाजलेली भाषणे, त्यांचे शैक्षणिक कार्य तसेच देशभरातील मान्यवरांचे लेख, मुलाखती व इतिहासात दडलेल्या शेकडो घटना व घडामोडींच्या नोंदी या ग्रंथात मांडण्यात आल्या आहेत.

संत साहित्याचे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. गजानन एकबोटे, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमाला प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याबरोबर 1970 सालापासून काम केलेले त्यांचे सहकारी, मित्र, स्नेही, सनदी अधिकारी व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास दादा पवार व अंशुल प्रकाशनच्या संचालिका प्रा. तृप्ती जगताप यांनी (Pimpri) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.