Pune : सुरक्षा ठेवीची रक्कम परत मागण्यासाठी 119 गणेश मंडळांकडून अर्ज नाही

एमपीसी न्यूज – सन 2022 मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतलेल्या तात्पुरत्या वीजजोडणीच्या सुरक्षा ठेवीची रक्कम परत मागण्यासाठी पुणे परिमंडलातील 119 गणेश मंडळांनी अर्जच सादर केलेले नाही. हा अर्ज ऑनलाइनद्वारे करणे व त्यात बँक खात्याचा तपशील देणे अनिवार्य आहे. यासाठी महावितरणकडून मदत व सहकार्य देण्याची तयारी असूनही अर्ज नसल्याने सुरक्षा ठेवीची रक्कम प्रलंबित आहे. पुणे (Pune) परिमंडलात आतापर्यंत 99 गणेश मंडळांना सुरक्षा ठेव परत करण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून त्यातील 62 मंडळांची सुरक्षा ठेव वीजबिलापोटी समायोजित करण्यात आली आहे तर उर्वरित 37 मंडळांची सुरक्षा ठेव बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

Maval : मावळ परिसरातील पर्यटनामुळे स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग, रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील – सुनील शेळके

गणेशोत्सवासाठी तात्पुरती वीजजोडणी घेतल्यानंतर सुरक्षा ठेवीची रक्कम ताबडतोब परत मिळत नाही अशा गणेश मंडळांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत गणेशोत्सवापूर्वी 28 ऑगस्टला मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी आढावा बैठक घेतली होती. गणेश मंडळांना सन 2022 मधील सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्याची प्रक्रिया तातडीने व विनाविलंब करण्याची सक्त सूचना त्यांनी केली. तसेच गणेश मंडळांच्या यंदाच्या सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्याची कार्यवाही गणेशोत्सवानंतर एक ते दोन महिन्यांमध्ये पूर्ण करावी. यामध्ये हयगय खपवून घेतली जाणार नाही असेही मुख्य अभियंता श्री. पवार यांनी स्पष्ट केले होते.

सन 2022 मध्ये पुणे परिमंडल अंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच मुळशी, मावळ, खेड या तीन तालुक्यांतील 204 सार्वजनिक गणेश मंडळांनी तात्पुरती वीजजोडणी घेतली होती. नियमानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम परत मागण्यासाठी संबंधित मंडळांनी ऑनलाइन अर्ज करणे व त्यात मंडळाच्या बँक खात्याचा तपशील नमूद करणे अनिवार्य आहे.

त्यानुसार 37 गणेश मंडळांकडून 3 लाख 2 हजार 167 रुपयांच्या सुरक्षा ठेवीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते मंजूर करण्यात आले. यातील 7 मंडळांना सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्यात आली असून उर्वरित मंडळांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे. तर 62 गणेश मंडळांनी गणेशोत्सवातील वीज वापरापोटी दिलेल्या बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे त्यांची 4 लाख 67 हजार 785 रुपयांची सुरक्षा ठेव वीजबिलापोटी समायोजित करण्यात आली आहे.

मात्र अद्यापही 119 गणेश मंडळांनी 6 लाख 11 हजार 862 रुपयांची सुरक्षा ठेव परत मागण्यासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे सुरक्षा ठेवीची पुढील प्रक्रिया प्रलंबित आहे. ज्या गणेश मंडळांनी सुरक्षा ठेव परत मागण्यासाठी अर्ज सादर केला नाही त्यांना महावितरणकडून संपर्क साधण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यास संबंधित कार्यालयाकडून सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षा ठेवीची रक्कम परत मागण्यासाठी तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गणेश मंडळांनी तातडीने संबंधित उपविभाग किंवा विभाग कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.