Maval : मावळ परिसरातील पर्यटनामुळे स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग, रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हे मावळच्या जनतेला अजित पवार यांनी दिलेले गिफ्ट आहे. मावळ (Maval) परिसरातील पर्यटनामुळे स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.

Talegaon Dabhade : शेतकरी तरुण मंडळाच्या वतीने 100 देशी प्रजातींचे वृक्षारोपण

पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीस आमदार सुनिल शेळके,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी गोपाल रेड्डी, पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण तर दुरदृष्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी. उपस्थित होते.

“मावळातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने ग्लास स्कायवॉकची उभारणी करण्यात येणार आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकल्पास तत्वतः मान्यता दिल्याबद्दल मावळच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो.या महत्त्वाकांक्षी पर्यटन विकास प्रकल्पामुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होण्यास नक्कीच मदत होणार आहे.” असे
आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले,लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेल्या उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्ग स्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे. या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणूकीला प्राधान्य द्यावे.पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करतांना काँक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा.पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा,अशी सूचनाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये (11 मार्च 2022) लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. मावळातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प उभारण्यात येणार असून येथे झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फुड पार्क,ॲम्फी थिएटर, खुली जीम, आणि विविध खेळ इ.सुविधा असणार आहे.प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.