Pimpri: शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट

जगताप प्रचारात सक्रिय होणार?

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे, यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची आज (शनिवारी) भेट घेतली. राऊत यांच्या शिष्टाईला कितपत यश येते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी वाकड येथील एका हॉटेलमध्ये जगताप यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली असून बैठकीतील तपशील मात्र गुलदस्त्यात आहे.

  • मावळ लोकसभेचा मतदारसंघाची शिवसेनेची उमेदवारी खासदार बारणे देण्यात आली आहे. शिवसेना- भाजपची युती झाली आहे, मात्र बारणे आणि  भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुतच आहे. बारणे यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. जगताप अजूनही प्रचारात सक्रिय झाले नाहीत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय बैठकीकडे देखील जगताप यांनी पाठ फिरविली होती.

त्यापार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार बारणे यांनी गुरुवारी (दि.28) आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली होती. त्यानंतर त्याचदिवशी आमदार लक्ष्मण जगताप यांची शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये मावळ लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. परंतु, त्यानंतर देखील जगताप प्रचारात सहभागी झाले नव्हते.

त्यानंतर आज शिवसेना नेते राऊत यांनी जगताप जगताप यांची भेट घेतली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे. या भेटीनंतर जगताप प्रचारात सक्रीय होणार का? याकडे भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.