Pune : कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन बेकायदेशीर तरी मुख्यमंत्री येणार का ? राष्ट्रवादीचा सवाल

एमपीसी न्यूज- शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करावे असा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. मात्र, सत्ताधारी भाजपने हा ठराव गुंडाळून रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे योजिले आहे. आज हे भूमिपूजन होत असून हे भूमिपूजन बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी प्रयत्न केले आहे. तर राष्ट्रवादीच्या तत्कालीन नगरसेविका भारती कदम यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पत्रानुसार रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करावे. कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक यांना निमंत्रित करावे असा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेने 2016साली मंजूर केला होता.

या रस्त्याचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा ठराव मंजूर असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करणे बेकायदेशीर आहे. या बेकायदेशीर कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार का असा सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.