Kasarwadi : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे-नाशिक रस्त्यावर कासारवाडी येथे झाला.

प्रकाश गणपत चिपाडे (वय 55, रा. मोशी प्राधिकरण) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पंकज प्रकाश चिपाडे (वय 26, रा. मोशी प्राधिकरण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश चिपाडे 16 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पुणे-नाशिक रस्त्याने दुचाकीवरून (एम एच 14 / ए वाय 3626) मोशीकडे जात होते. कासारवाडी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलावर ते आले असता त्यांना अज्ञान वाहनाने मागील बाजूने धडक दिली. यामध्ये ते पुलावरून खाली रस्त्यावर पडले. अपघातात त्यांना दोन्ही पाय, हात, पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून निघून गेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस वाय पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.