Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथील साई ड्रीम्स गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेत आग; सुदैवाने जीवितहानी झाली नाही

इमारतीमधील अनेक घरांमध्ये धूर

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील साई ड्रीम्स गृहनिर्माण संस्थेतील एका सदनिकेत आग लागली. याचा धूर इमारतीमधील इतर सदनिकांमध्ये गेल्याने अनेकांना घराबाहेर पडता आले नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधील(Pimple Saudagar) इतर घरांमध्ये धुरामुळे अडकलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह वृद्ध दाम्पत्याला सुरक्षित ठिकाळी हलवले. ही घटना रविवारी (दि. 5 ) रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, “पिंपळे सौदागर येथे गोविंद गार्डनजवळ ‘साई ड्रीम्स’ या सोसायटीमध्ये सी 402 या सदनिकेत आग लागल्याची वर्दी निशांत फलके यांनी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र, रहाटणी, थेरगाव उप अग्निशमन केंद्र येथील पथके तात्काळ साई ड्रीम्स गृहनिर्माण संस्थेत दाखल झाली”.

घरातील हॉलमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, किचन मधील साहित्याला आग लागली होती. तसेच मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी बीए सेट वापरून आगीवर नियंत्रण मिळवले.

ही आग विझवत असताना इमारतीमधील इतर घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. एका घरात धुरात अडलेल्या दोन वर्षीय चार्वी गव्हाणे हिला ट्रेनी फायरमन विकास कुटे यांनी बाहेर काढले. तसेच सहाव्या मजल्यावर बंद सदनिकेत एक वृद्ध दाम्पत्य अडकले होते. त्यांना देखील सुखरूपपणे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी नाही.

सब ऑफिसर विजय घुगे, लिडिंग फायरमन विकास नाईक, विकास तोरडमल, फायरमन अनिल वाघ, अमोल चिपळूणकर, ट्रेनी सब ऑफिसर पाठक, श्री. शुक्ल तसेच तीन ट्रेनी फायरमन  आणि इतर कर्मचारी वर्दीवर(Pimple Saudagar) कार्यरत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.