Pragati Express : प्रगती, डेक्कन एक्सप्रेसच्या व्हिस्टाडोमला प्रवाशांची पसंती

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या सहा रेल्वे गाड्यांना व्हिस्टाडोम बसविण्यात आला ( Pragati Express)  आहे. त्यामध्ये प्रगती एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. यातील तीन गाड्या पुणे-मुंबई दरम्यान धावतात. मागील वर्षभरात व्हिस्टाडोम मधून एक लाख 76 हजार 404 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मध्य रेल्वेला 26 कोटी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यातील प्रगती एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस या रेल्वेमध्ये प्रवाशांनी सर्वाधिक व्हिस्टाडोमला पसंती दिली आहे.

पुणे-मुंबई दरम्यान धावणा-या डेक्कन एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेसने व्हिस्टाडोममध्ये सर्वाधिक व्यवसाय केला. डेक्कन एक्सप्रेस मधून वर्षभरात 31 हजार 162 तर प्रगती मधून 30 हजार 981 प्रवाशांनी प्रवास केला. त्याखालोखाल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस, मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

 

Vadgaon Maval : सेवानिवृत्ती नंतरही रयत सेवक भरीव योगदान देतो; डॉ. अनिल पाटील यांचे प्रतिपादन

 

पसंतीच्या बाबतीत सर्वात खाली असलेली तेजस एक्सप्रेस महसुलाच्या बाबतीत सर्वात प्रथम आहे. तेजस एक्सप्रेसच्या व्हिस्टाडोम मधून वर्षभरात सात कोटी 68 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जनशताब्दी एक्सप्रेस 6 कोटी 16 लाखांच्या उत्पन्नासह दुसऱ्या स्थानावर आहे. शताब्दी एक्सप्रेस चार कोटी 98 लाख, डेक्कन क्वीन दोन कोटी 72 लाख, प्रगती एक्सप्रेस दोन कोटी 60 लाख तर डेक्कन एक्सप्रेस दोन कोटी 35 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

सन 2018 मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेवर सादर करण्यात आले. प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे, मुंबई-मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच 15 सप्दिटेंबर 2022 पासून तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आला. या डब्यांच्या लोकप्रियतेमुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये 26 जून 2021 पासून हे डबे सुरू करण्यात आले. 15 ऑगस्ट 2021 पासून आणखी दोन  व्हिस्टाडोम डेक्कन क्वीनला जोडण्यात आले. प्रगती एक्सप्रेस मध्ये 25 जुलै 2022 तर शताब्दी एक्सप्रेसमध्ये 10 ऑगस्ट 2022 पासून  व्हिस्टाडोम जोडण्यात आले.

व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छतासोबतच रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे, सिरॅमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्ये असून व्ह्यूइंग गॅलरी देखील आहे. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये, मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी या गाड्यांना प्रवाशांची नेहमी विशेषतः पावसाळ्यात पसंती ( Pragati Express) असते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.